सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त युनिटी पदयात्रा उत्साहात

दर्पण न्यूज मिरज/ सांगली – : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सरदार @150 एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा आज उत्साहात संपन्न झाली. तरुण भारत स्टेडियम येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पदयात्रेची सुरूवात करण्यात आली.
जिल्हा प्रशासन व मेरा युवा भारत सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही पदयात्रा तरुण भारत स्टेडियम सांगली येथून सुरू होऊन सिटी पोस्ट मार्गे शिवाजी क्रीडांगण या ठिकाणी या पदयात्रेची सांगता झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, लेखालिपिक व कार्यक्रम पर्यवेक्षक सिद्धार्थ चव्हाण आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी एकतेची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्र वरील शाहिरी पथकाच्या पोवाड्याने झाली तर सांगता राष्ट्रीय एकतेवरील सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.
या पदयात्रेत मेरा युवा भारत सांगली, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स, जिल्हा आरोग्य विभाग व आरोग्य पथक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात ही पदयात्रा आयोजित करण्यात आली. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सागर व्हनमाने, महेंद्र साठे, शुभम कानडे, प्रशांत पाटील,राजमती वाडकर यांनी परिश्रम घेतले.


