शालेय राज्यस्तर मल्लखांब स्पर्धा : मुलांच्या गटात कोल्हापूर तर मुलींच्या गटात मुंबई विभागास विजेतेपद
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या संघांना व खेळाडुंना पारितोषिक वितरण

दर्पण न्यूज मिरज / सांगली : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुला-मुलींच्या मल्लखांब स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूर विभाग तर मुलींच्या गटात मुंबई विभाग अव्वल ठरला. विजयी संघ व खेळाडूंना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
तालुका क्रीडा संकुल, मिरज येथे राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या आठ विभागातून खेळाडू सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर व क्रीडा अधिकारी, खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होते.
मुलांच्या गटात वैयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक आयुष काळंगे, द्वितीय क्रमांक वेदांत कदम, दोन्ही कोल्हापूर विभाग. तृतीय क्रमांक निरंजन अमृते, मुंबई विभाग व चतुर्थ क्रमांक वेदांत वाडेकर, पुणे विभाग यांनी विजयश्री प्राप्त केली, तर मुलांच्या सांघिक विजेतेपदांमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक कोल्हापूर, द्वितीय पुणे व तृतीय मुंबई विभाग यांनी यश मिळवले.
मुलींच्या गटामध्ये वैयक्तिक प्रकारामध्ये प्रथम क्रमांक समिक्षा सुरडकर, द्वितीय धनश्री जाधव, तृतीय क्रमांक खुशी पुजारी सर्व मुंबई विभाग व चतुर्थ क्रमांक कृष्णाली क्षीरसागर कोल्हापूर विभाग यांनी विजय संपादन कैला. तर सांघिक प्रकारांमध्ये अनुक्रमे प्रथम मुंबई विभाग, द्वितीय पुणे विभाग व तृतीय क्रमांक कोल्हापूर विभाग यांनी पटकावले.
या स्पर्धेतील विजयी खेळाडू उज्जैन (मध्य प्रदेश) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत, मुलींच्या गटामध्ये समिक्षा सुरडकर, धनश्री जाधव, खुशी पुजारी सर्व मुंबई विभाग व कृष्णाली क्षीरसागर कोल्हापूर विभाग. मुलांच्या गटात आयुष काळंगे व वेदांत कदम दोन्ही कोल्हापूर विभाग, निरंजन अमृते मुंबई विभाग व वेदांत वाडेकर पुणे विभाग अशी त्यांची नावे आहेत.
या स्पर्धेसाठी निवड चाचणी सदस्य म्हणून सुमित शेंडगे (सातारा), बाबासाहेब समलेवाले (सांगली) व विनायक राजमांचीकर (पुणे) यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका क्रीडा संकुल मिरज येथील कर्मचारी आणि सांगली जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.


