महाराष्ट्रराजकीयसामाजिक

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 :  नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये अडीच लाख मतदार, 291 मतदान केंद्रे :  जिल्हाधिकारी अशोक काकडे

  दर्पण न्यूज मिरज/  सांगली : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. या सर्व नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 57 हजार 977 इतके मतदार असून एकूण 291 मतदान केंद्रे आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदेपैकी उरूण-ईश्वरपूर व विटा या ब वर्ग नगरपरिषदा आहेत तर आष्टा, तासगाव, जत, पलूस या क वर्ग नगरपरिषदा आहेत. शिराळा व आटपाडी या नगरपंचायती आहेत. या सर्व नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 57 हजार 977 इतके मतदार असून एकूण 291 मतदान केंद्रे आहेत. एकूण 107 प्रभाग असून एकूण सदस्य संख्या 181 आहे. यापैकी महिला सदस्य संख्या 92 आहे. एकूण 181 सदस्य संख्यैपैकी अनुसूचित जाती 24, अनुसूचित जमाती 01, नागरिकांचा मागास प्रवर्ग 48 व सर्वसाधारण 108 सदस्य संख्या आहे.

     जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिनांक 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरणे व स्वीकारण्याचा कालावधी आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे दि. 19 ते 21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे, अपील असल्यास दि. 21 ते 25 नोव्हेंबर असा आहे. अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दि. 25 नोव्हेंबरपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 26 नोव्हेंबर आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रात होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असे ते यावेळी म्हणाले.

    नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील ब वर्ग नगरपरिषदेसाठी (विटा व उरूण-ईश्वरपूर) थेट अध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार व सदस्य पदासाठी 3 लाख 50 हजार खर्च मर्यादा आहे. क वर्ग नगरपरिषदेसाठी (आष्टा, तासगाव, जत व पलूस) थेट अध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार व सदस्य पदासाठी 2 लाख 50 हजार तर नगरपंचायत (शिराळा व आटपाडी) थेट अध्यक्ष पदासाठी 6 लाख रूपये व सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार रूपये खर्च मर्यादा असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.    स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात येत असून या अभियानाचा उद्देश प्रत्येक पात्र मतदाराने आपले मतदानाचे कर्तव्य न चुकवता पार पाडावे आणि लोकशाही बळकट करावी असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!