आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा, निःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा : जिल्हाधिकारी अशोक काकडे
यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना ; नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 ;


दर्पण न्यूज मिरज/ सांगली -: : सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून त्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, याची संबंधित यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ही निवडणूक निःपक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या.
सांगली जिल्ह्यात आष्टा, उरुण – ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा नगरपरिषद या 6 नगरपरिषदा व आटपाडी व शिराळा या दोन नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे व दूरदृष्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील संबंधित 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजयकुमार नष्टे, श्रीनिवास अर्जुन, सहआयुक्त, नगर प्रशासन दत्तात्रय लांघी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सुशांत पाटील यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसीलदार, निवडणूक होत असलेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
आदर्श आचारसंहितेतील 24, 48 आणि 72 तासांतील कार्यवाही पूर्ण झाल्याची खात्री करण्याचे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवावा. आवश्यकतेनुसार क्षेत्रीय भेटी व मतदान केंद्रांना भेटी द्याव्यात. प्रत्येक प्रभागासाठी चोख नियोजन करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची जबाबदारी समजून सांगावी. निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शांततेत, निःपक्ष, पारदर्शी वातावरणात पार पडेल, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता संबंधित सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मतदान केंद्रांवरही योग्य व किमान आवश्यक सुविधांबाबत तयारी करावी. दिव्यांग, गर्भवती महिला व जेष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक अधिकारी मार्गदर्शक सूचनांचा व्यवस्थित अभ्यास करून नियमांचे तंतोतंत पालन करावे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील सर्व नियम, कालावधी व वेळा यांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, निवडणूक होत असलेल्या क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय व सुसंवाद ठेवावा. संवेदनशील मतदान केंद्रांना संयुक्त भेटी द्याव्यात. आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. चोख बंदोबस्त ठेवावा. कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, यासाठी नियोजन करावे, असे ते म्हणाले.


