स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील
श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन : बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

दर्पण न्यूज सांगली /मिरज : बाबा… स्मृतीने, तुमच्या लेकीने, आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. केवळ सांगलीकरच नाही; तर प्रत्येक भारतीयाला टीम इंडियाचा अभिमान आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिला क्रिकेट टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी काढले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या निवासस्थानी काल जाऊन तिच्या आई-वडिलांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना, आई स्मिता, भाऊ श्रावण उपस्थित होते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्मृती मानधना आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे. ह्या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवसणी घालेल. त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील आणि यातून देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


