महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : ॲड. करुणा विमल यांची मागणी

कोल्हापूर, अनिल पाटील
साताऱ्यामध्ये डॉ. संपदा मुंडे या महिला डॉक्टर ने मानसिक व शारीरिक छळामुळे आत्महत्या केली. आरोपीला वाचवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिकाच शंकास्पद वाटत आहे. त्यांनी कोणतीही चौकशी पूर्ण होण्याच्या अगोदर डॉक्टर महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढण्याचे काम केले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी केली.
त्यांनी आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा तात्काळ द्यावा यासाठी शाहू समाधी स्थळ या ठिकाणी झालेल्या मूक निदर्शनावेळी सामुहिक मागणी केली.
सध्याच्या आधुनिक काळात महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढतच आहे. सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ असे म्हणत मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहे. पण शिक्षणाच्या व नोकरीच्या ठिकाणी महिला व मुली सुरक्षित नाहीत. तिच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे. त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून छळ केला जात आहे. ही समाजासाठी फार गंभीर गोष्ट आहे. डॉ. संपदा मुंडे या डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टर तरुणीची तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती. शिवाय पोलीस अधिकारीच तिच्यावर अन्याय, अत्याचार करतात व आरोपीला मदत करतात. हे सर्व चिंताजनक आणि चिड आणणारे आहे. पिडीतेच्या आत्महत्या नंतर देखील गुन्हा नोंदवण्यास उशीर केला जातो. त्यामध्ये राज्यसरकार, महिला आयोग, गृह खाते व सार्वजनिक आरोग्य खाते यांनी तत्परतेने या तरुणीला न्याय मिळवून देण्याची गरज असतांना सदरच्या घटनेचे राजकारण केले जात आहे. खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याच चुकीची भूमिका घेत असल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीने शाहू समाधी स्थळ, कोल्हापूर या ठिकाणी मूक निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनात भारती पोवार, वृषाली कवठेकर, सुलभा भणगे, सीमा पाटील, रेहाना मुरसल ,अनिता गवळी, ज्योती डोंगरे, अनिता बावडेकर, भारती खिल्लारे, गीता हासूरकर, अंतिमा कोल्हापूरकर, चंदा बेलेकर, उज्वला चौगले, अलका सणगर, सुनील जाधव, अर्हंत मिणचेकर, मारुती कोळी, गंगाधर म्हमाने, विजय पटकारे शंकर कांबळे, अमिरत्न मिणचेकर यांच्यासह समतावादी स्त्री-पुरुष व विविध परिवर्तनवादी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


