उसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये द्या ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोनहिरा, क्रांती कारखान्यांना निवेदन
संस्थापक अध्यक्ष मा खा राजू शेट्टी यांनी 24 व्या ऊस परिषदेत केलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा


दर्पण न्यूज भिलवडी /पलूस :- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात आंदोलनाची आजच्या निवेदनापासून क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्याचे चेअरमन श्री शरद भाऊ लाड व सोनेरा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांना स्वाभिमानी शेतकरी संस्थापक अध्यक्ष मा खा राजू शेट्टी साहेब यांनी 24 व्या ऊस परिषदेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे ऊसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये व मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपये चा हप्ता देण्यात यावा त्याशिवाय कारखाने सुरू करू नये ,अशा आशयाचे निवेदन देण्यात आले, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली.
या निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरून साखर कारखान्याचा गळीत हंगाम तोंडावर आलेला आहे. गेल्या वर्षभरात साखर व उपपदार्थांना चांगला दर मिळालेला आहे. वर्षभरातील साखरेची सरासरी काढल्यास ३८०० रूपये क्विंटलने विक्री झालेली आहे. इथेनॅाल , बगॅस , मोलॅसिस , प्रेसमड , अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळाला असून गेल्या वर्षभरात भाव स्थिर होते.
ऊस उत्पादक शेतक-यांना गेल्या चार ते पाच वर्षात ३ हजार ते ३१०० पर्यंत मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने वाढविलेल्या एफ. आर. पी. चे ऊस उत्पादक शेतक-यांना कोणताच लाभ झालेला नाही. साखर व उपपदार्थ विक्रीतून आलेल्या पैशामधून साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च , तोडणी वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले असून प्रतिटन २०० रूपयाचा दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे. त्याबरोबरच चालू गळीत हंगामामध्ये ३७५१ रूपये दर देणे सहज शक्य आहे.
आपल्या कारखान्याकडून तोडणी वाहतूक प्रतिटन इतकी कपात केली जात आहे. वास्तिवक पाहता २५ किलोमीटर परिघामध्ये आपल्या कारखान्यास मुबलक ऊस असल्यानेच आपल्या कारखान्यास वाढीव गाळपास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे आपल्या कारखान्याने २५ किलोमीटर करिता असणारी प्रतिटन ७५० रूपये तोडणी वाहतूक इतकीच कपात करणे गरजेचे आहे. आपल्या कारखान्याकडून कार्यक्षेत्राबाहेरील ५० ते १०० किलोमीटर अंतरावरून ऊस वाहतूक करून लुबाडणूक केली जात आहे व वाढीव तोडणी वाहतुकीचा प्रतिटन १०० रूपयापासून ते ३०० रूपयाचा अतिरिक्त खर्च शेतक-यांच्यावर पडू लागला आहे. यामुळे यावर्षी २५ किलोमीटरचीच तोडणी वाहतूक कारखान्याकडून कपात करण्यात यावी हि विनंती.
याबाबत आपणाकडून कार्यवाही न झाल्यास स्वाभिमानीच्या २४ व्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे ११ नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाळासो शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजेंद्र माने रोहित पाटील बाळासाहेब जाधव बटु दादा फाळके अजमुद्दिन मुजावर अशोक पवार आप्पासो महाडिक अक्षय सूर्यवंशी जयदीप यादव उपस्थित होते


