शिक्षकच विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू शकतात : सीईओ विशाल नरवाडे
शिक्षक संघाच्या वतीने स्वागत सत्कार व विविध प्रश्नावर चर्चा

दर्पण न्यूज मिरज/सांगली :- सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) जिल्हाध्यक्ष अमोल माने व सरचिटणीस राहुल पाटणे यांच्यासह शिष्ट मंडळाने स्वागत सत्कार केला. प्राथमिक शिक्षकांच्या विविध वीस प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. मॉडेल स्कूलच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये शाळांच्या इमारती उत्तम झाल्या असून आता विद्यार्थी गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून गुणवत्ता वाढवू शकतात असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून फेटा व पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित असणारे वीस प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना सांगितले. यामध्ये भाषा ,गणित विज्ञान व समाजशास्त्र ३३ टक्के विषय शिक्षकांना पदवीधर विषय शिक्षकांची वेतन श्रेणी, राज्यातील इतर जिल्हा परिषदांप्रमाणे आपल्या सांगली जिल्हा परिषदेने ही २०१४ मध्ये पदोन्नतीने नियुक्ती दिलेल्या पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर विषय शिक्षकांची वेतन श्रेणी सरसकट लागू करण्यासंदर्भात फेरविचार करणे, पदवीधर प्राथमिक शिक्षकांची वेतन त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर सेवा पुस्तके मागून वेतन निश्चिती करण्याचे आदेश होणे,२००५ पूर्वी जाहिरात असणाऱ्या व २००५ नंतर नियुक्त शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देणे,मुख्याध्यापक पदोन्नती साठी वापरल्या जाणाऱ्या ज्येष्ठता यादीतील जष्ठतेनुसार शाळेचा मुख्याध्यापक ( प्रभारी ) पदभार स्विकारण्याचे आदेश होणे, प्रलंबित असणारी वैद्यकीय बिले दिवाळी सुट्टीमध्ये स्वतंत्र कॅम्प लावून त्रुटी पूर्तता करून घेऊन मंजुरी देणे.
याबरोबरच प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा एक तारखेला करणे,भविष्य निर्वाह निधी कर्ज प्रकरणे मंजूर होण्यास विलंब लागतो सदर प्रकरणे मंजूर करण्यासाठी कालावधी निश्चित करणे,भविष्य निर्वाह निधी कर्ज प्रकरणांना तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर शिक्षण विभागाकडून तालुक्याला पुन्हा प्रकरण न पाठवता प्रशासकीय मंजुरीसाठी डायरेक्ट वित्त विभागाकडे पाठविणे,सांगली जिल्हा परिषदेकडे कार्यरत असणारे शिक्षक व शिक्षण सेवकांना जिल्हा परिषदे कडून ओळखपत्र देणे,सन २०२४ – २५ संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांचे समायोजन करणे,जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सोयीनुसार पदस्थापना देणे,बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारा निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीचा विषय मार्गी लावणे ,आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजुरीसाठी वेतनास संरक्षण देऊन वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करणे,शाळांना स्टेशनरी खरेदी करण्यासाठी ४ टक्के साधील अनुदान देणे,गुणवत्ता शोध परीक्षा व डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर विद्यार्थ्यांना मोफत देणे,पदवीधर विषय शिक्षक रिव्हर्शन प्रक्रिया राबविणे.
जिल्हा परिषद शाळांना पूर्वी दिलेल्या जमिनी पुन्हा मिळविण्यासाठी काही गावांमध्ये मालक / वारसांनी न्यायालयात दावे दाखल केले आहेत अशा प्रकरणात जिल्हा परिषदे कडून शाळेसाठी वकील देऊन मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करणे,१०० टक्के शाळांच्या मुख्याध्यापकांना शालेय अभिलेखे अध्यायावत करणे, शिक्षकांचे ऑनलाइन वेतन कामकाज व शालेय स्तरावरील सर्व प्रशासकीय कामकाज यासाठी प्रशिक्षण देणे अशा वीस प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.प्रलंबित असणारे सर्वच प्रश्न लवकरच सोडवले जातील असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिला. शाळेचा दर्जा व विद्यार्थी गुणवत्तेसाठी प्रत्येक शिक्षक काम करत असून येणाऱ्या दिवसात गुणवत्तेचा आलेख आणखीन वाढवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील राहतील असा विश्वास शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने व सरचिटणीस राहुल पाटणे यांनी दिला.
यावेळी अमोल माने, राहुल पाटणे,भारत क्षिरसागर,बाळू गायकवाड, संजय खरात, संभाजी ठोंबरे, कैलास गायकवाड,प्रकाश पवार, प्रवीण येटम, नंदकिशोर महामुनी, महंम्मदअली जमादार, संतोष गुरव, मंदाकिनी ढापरे,नागसेन कदम, राजू केंगार, विजय कांबळे, रवींद्र दबडे, संतोष निकाळजे, विजय पाटील, वैभव बंडगर, अविनाश भंडारे, सतीश गिरीबुवा, जाफर चौगुले,अरुण कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


