वाचन प्रेरणा दिनानिमित्त बुधवारी ऐतिहासिक मूल्य असलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन : जिल्हाधिकारी अशोक काकडे

दर्पण न्यूज मिरज / सांगली : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दि. 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. या औचित्याने मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन व संवर्धन होण्याच्या अनुषंगाने बुधवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, जुने स्टेशन चौक येथे ऐतिहासिक मूल्य असलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, 2021 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने गठित जिल्हा मराठी भाषा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस तहसीलदार लीना खरात, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, अशासकीय सदस्य अविनाश सप्रे, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, महापालिकेचे संतोष बेलवलकर आदि उपस्थित होते.
वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे नेटके आयोजन करावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, “घेवूया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा” ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून या प्रदर्शनात जिल्ह्यातील ऐतिहासिक मूल्य असलेली ग्रंथसंपदा, संदर्भ मूल्य असलेले ग्रंथ, संस्थानकालिन गॅझेटियर, सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांचे जुने दस्तावेज, महनीय व्यक्तिंकडून स्वाक्षरीत साहित्यसंपदा आदिंचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, शाळांमधील ग्रंथालयांतील ग्रंथसंपदा अवलोकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत शालेय स्तरावरील ग्रंथपालांना सूचित करावे. पीएच. डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.


