महाराष्ट्रराजकीयसामाजिक

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या ; पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 

दर्पण न्यूज  कोल्हापूर – : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी योग्य पद्धतीने पंचनामे करून शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी प्रशासन, कृषी विभागाचे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे उपस्थित होते. तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, दिवाळीपूर्वी सर्व बाधित शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेली नुकसान भरपाई वितरित करावी. पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी गावपातळीवर खात्री करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

सर्व बाधित शेतकऱ्यांना योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने नुकसान भरपाई मिळाली तरच शासनाच्या या घोषणेचा खरा फायदा होईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री अबिटकर यांनी बैठकीत दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व अतिवृष्टीमुळे शेती, जनावरे, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आलेले सर्व अनुदान 18 कोटी 30 लाख 40 हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण 63 मंडळांमध्ये 382 गावांमध्ये 12,125.57 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या आपत्तीमुळे 47,903 शेतकरी बाधित झाले असून या शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 30 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
००००

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!