सांगली जिल्हा : पंचायत समिती सभापती आरक्षण निश्चिती शुक्रवारी

दर्पण न्यूज सांगली : सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समितीमधील सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता आरक्षण सोडत काढण्याचे निश्चित केले आहे. ज्या नागरिकांना सदर सभेस हजर राहणेचे आहे, त्यांनी नमूद केलेल्या दिनांक, वेळ व ठिकाणी हजर रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सांगली जिल्ह्यातील १० पंचायत समितीचे, सभापती आरक्षण निश्चित करणेसाठी महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, मुंबई यांच्याकडील अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम २ फ यातील तरतुदीनुसार पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना प्राप्त आहेत. त्यानुषंगाने सांगली जिल्ह्यातील १० पंचायत समिती मधील सभापती आरक्षण काढणे आवश्यक आहे. हे आरक्षण काढण्यासाठी शासन अधिसूचना लगत अनुसूचीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रवर्गासाठी, सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांची संख्या ठरवून दिली आहे.
त्यानुसार आरक्षणाचा प्रवर्ग व संख्या पुढीलप्रमाणे – अनुसूचित जाती (महिला) – १, नागरिकांचा मागास प्रवर्ग – २, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – १, सर्वसाधारण – ३, सर्वसाधारण (महिला) – ३, एकूण संख्या – १०