अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले निर्देश : महसूल, ग्रामविकास, कृषि विभागाने बांधावर जावून संयुक्त पंचनामे करावेत

दर्पण न्यूज मिरज/सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन व प्रशासन भक्कमपणे असून, झालेल्या नुकसानीचे महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून आठ दिवसात संयुक्त पंचनामे करावेत. बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई जमा होईल, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.
जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदिंसह नियोजन, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आदि संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तसेच महसूल, नगरविकास, ग्रामविकास व कृषि विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासनस्तरावर प्रति हेक्टर किती मदत द्यायची, याचा निर्णय झाला कि, तात्काळ संबंधिताच्या खात्यावर रक्कम जमा होईल, यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष बांधावर जावून आठ दिवसात पंचनामे करावेत. दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होईल, या दृष्टीने कार्यवाही करावी. पिकांच्या नुकसानीव्यतिरीक्त जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकारानुसार घरे, गुरे, जीवितहानीसाठी शासन निर्देशानुसार नुकसानभरपाई देण्यात येते. त्याचे वाटपही करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे संबंधित विभागांनी सुरू असलेली कार्यवाही गतीने करत आठ दिवसात नुकसानभरपाईचे पंचनामे करावेत. पिकांव्यतिरीक्त झालेल्या नुकसानीसाठी पंचनाम्यानुसार प्राप्त निधीचे वाटप तातडीने करावे. जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिकार असलेल्या बाबी प्राधान्याने कराव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले.पा
लकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान नियमानुसार द्यावे. जिथे मदत देणे ही बाब शासकीय नियमांच्या चौकटीत बसत नाही, अशा काही प्रकरणांचा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी अभ्यास करावा. त्यासाठी प्रातिनिधीक तत्त्वावर जत आणि तासगाव तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने ही केस स्टडी करावी. अशा बाबतीत सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबत सादरीकरण केले. तसेच, पंचनामे गतीने होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी कृषि विभागांतर्गत सादरीकरण केले. यामध्ये खरीप हंगामातील पेरणी, पीकपेरणी अहवाल, गतवर्षी आणि चालू वर्षातील पर्जन्यमान तुलना, दिनांक 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झालेली महसूल मंडळे, सप्टेंबर महिन्यात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झालेली महसूल मंडळे, नैसर्गिक आपत्ती अहवाल यांची माहिती सादर करण्यात आली.