आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि रुग्णसेवा बाबतीत कुचराई खपवून घेणार नाही : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 दर्पण न्यूज मुंबई : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम दर्जाचा पौष्टिक आहार पुरवला गेला पाहिजे. तसेच रुग्णसेवा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत असलेल्या आरोग्य संस्थांमधील स्वच्छता सेवा, धुलाई सेवा, आहार सेवा, औषध पुरवठा आणि मनुष्यबळ सेवा आदी बाबींचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला.

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, रुग्णालयात दाखल रुग्णांना पौष्टिक व दर्जेदार आहार मिळाला पाहिजे. रुग्णालय व परिसराची अंतर्बाह्य स्वच्छता ठेवला गेला पाहिजे. तसेच पुरेसा औषधसाठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. या सर्व बाबींची काटेकोर तपासणी केली जाईल. संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांनी रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा.

रुग्णालयात आलेल्या रुग्णाला प्रसन्न व समाधानकारक वातावरण मिळाले पाहिजे. रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच स्वच्छता सेवेसाठी नियुक्त कंत्राटदार कामगारांना करारानुसार पगार देत आहेत का, याचीही काटेकोर पडताळणी करण्यात यावी, असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राबविण्यास दिलेल्या परवानगीचे स्वागत करताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत होणाऱ्या उपचारांसाठी नागरिकांनी खासगी रुग्णालयांऐवजी शासकीय रुग्णालयांना प्राधान्य द्यावे, यासाठी आवश्यक सुविधा, वातावरण आणि उपचाराची गुणवत्ता शासकीय रुग्णालयांत असली पाहिजे. यामुळे शासकीय योजनांचा निधी शासकीय रुग्णालयांकडे वळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा व दर्जेदार औषधसाठा ठेवला गेला पाहिजे, औषध खरेदी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

या बैठकीला आरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्यसेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!