कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा सोमवारी भव्य शुभारंभ

दर्पण न्यूज कोल्हापूर, : जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा शुभारंभ उद्या सोमवार २२ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व लोकसभा सदस्य श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक दसरा चौक मैदान येथे सायं. ६ वाजता होणार आहे.
कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, अरुण लाड, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, शिवाजीराव पाटील, राहुल आवाडे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
दिनांक २२ सप्टेंबर रोजी होणारे कार्यक्रम-
तत्पूर्वी २२ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वा. शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उद्घाटन राजर्षी शाहू स्मारक भवन सभागृह, दसरा चौक येथे होणार आहे. त्यानंतर सायं. ६ वाजता दसरा महोत्सव उद्घाटन समारंभ झाल्यानंतर ‘गाथा शिवशंभूची’ ऐतिहासिक महानाट्य दसरा चौक मैदान, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तसेच शहरात दाखल होणाऱ्या सर्व भाविक- पर्यटकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Maharashtra DGIPR
Collector and District Magistrate Kolhapur