चाळीस वर्षांपासून बंद असलेला खटावातील लक्ष्मी रस्ता खुला ; प्रशासनाचे सहकार्य ,ग्रामस्थांच्या एकजुटीला यश
सुमारे 200 हून अधिक शेतकऱ्यांना थेट होणार फायदा : लोकांमध्ये समाधान

दर्पण न्यूज भिलवडी/खटाव -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील खटाव येथील गेल्या चाळीस वर्षांपासून बंद असलेला खटाव गावातील लक्ष्मी रस्ता अखेर प्रशासनाच्या प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे खुला झाला. या रस्त्यामुळे सुमारे 200 हून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून, शेतमाल बाजारात पोहोचविणे तसेच महापुरासारख्या आपत्तीच्या काळात बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे.
लक्ष्मी रस्ता हा गावाचा पारंपारिक वहिवाटीचा मार्ग असला, तरी दोन गटातील शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे मागील चार दशकांपासून तो बंद होता. परिणामी, गावातील शेतकरी व ग्रामस्थांना शेतमालाची वाहतूक करताना फार मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी या रस्ता खुला करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मागणीचा विचार करून सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तहसीलदार दिप्ती रिठे यांच्या सूचनेनुसार भिलवडी मंडल अधिकारी आण्णासाहेब हांगे, महसूल अधिकारी सोमेश्वर जायभाय, पुजा सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी शासनाच्या 22 मे 2025 च्या निर्णयानुसार कारवाईला वेग दिला.शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता अधिकृतरीत्या खुला करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांचा सहभाग होता.
तक्रारदार शेतकरी गजानन पाटील, अभिजीत पाटील, गणेश जाधव यांनी प्रशासनाच्या मध्यस्थीला मान देऊन सामोपचाराने एक पाऊल मागे टाकले. या सहकार्यामुळेच रस्ता मोकळा करण्याचा मार्ग सुकर झाला. ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, माजी उपसरपंच शिवाजी पाटील, दिपक पाटील, प्रसाद पाटील, संजय कर्नाळे, संभाजी मदने,केशव पाटील, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच महावितरण, भूमी अभिलेख व ग्रामपंचायत प्रशासन यांनीही या कामात मोलाची भूमिका बजावली.
रस्ता खुला होताच ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून निधी गोळा करून मुरूम टाकून रस्त्या दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे केवळ शेतमाल वाहतुकीचे प्रश्न सुटणार नाहीत, तर भविष्यातील विकासकामांना देखील चालना मिळणार आहे.गेल्या चाळीस वर्षांचा रस्त्याचा बंदिस्तपणा दूर झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पलूस तहसील प्रशासन, तक्रारदार शेतकरी व ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.