माजी सहकार मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारक लोकार्पण वर्षपूर्तीचा सोहळा उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी/ कडेगांव :- सांगली जिल्हा कडेगांव तालुक्यातील सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, पलूस-कडेगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते व ताकारी-म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे शिल्पकार स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारक लोकार्पण वर्षपूर्तीचा सोहळा उत्साहात झाला.
यावेळी माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या जलसिंचन योजनांपासून ते शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानापर्यंत, प्रत्येक कार्यामध्ये साहेबांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिसून येते. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. समाजकारण, शिक्षण, सिंचन व ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांत त्यांनी घडवलेली परंपरा आजही प्रेरणादायी आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या अकाली निधनानंतर माजी आमदार आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत आलो आहे.स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांची जिद्द साऱ्यांनीच पाहिली आहे. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीचे परिवर्तन झाले पाहिजे, इथला प्रत्येक जण समृद्ध झाला पाहिजे हा विचार उराशी बाळगून साहेब काम करीत राहिले. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांला शिक्षण मिळाले पाहिजे ही साहेबांची तळमळ होती. गाव तिथे एसटी ही योजना त्यांनी पोटतिडकीने राबवली. ताकारी-टेंभू योजनेमुळेच माझा शेतकरी प्रगती झाली साधेल याची त्यांना जाण होती. साहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा आदर्श घेऊन जनतेच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल हे मात्र नक्की. पलूस-कडेगावच्या मातीशी बांधील राहण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे व पुढेही करीत राहीन , असे ही आश्वासन आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दिले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व पतंगराव कदम यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
स्व पतंगराव कदम यांचे निकटवर्तीय सहकारी मानसिंग बँकचे संस्थापक लोकनेते जे के बापू जाधव यांनी ही आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी माजी विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार, आ. सतेज पाटील, कृष्णा सहकारी सहकार कारखान्याचे माजी चेअरमन मा. इंद्रजीतबाबा मोहिते, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सांगलीचे खासदार विशाल पाटील , श्रीमती विजयमाला कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रआप्पा लाड, . रघुनाथदादा कदम, शांतारामबापू कदम, . चंदुशेठ कदम, लोकनेते जे के बापू जाधव, जितेश कदम, विविध क्षेत्रातील मान्यवर, पलूस कडेगांव मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.