टाकळीभानच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणपती बनविणे कार्यशाळा संपन्न

टाकळीभान: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालया मध्ये गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या माती पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली .यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्कृष्ट कलावंत उदयकुमार क्षीरसागर तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उदयकुमार क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की , शाडूची माती नैसर्गिक व पर्यावरण पूरक असल्याने त्यापासून बनवलेले गणपती लवकरात लवकर पाण्यामध्ये विरघळतात व पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही . शाडू माती बरोबरच मोठ्या प्रमाणात लोह असणाऱ्या लाल मातीचे गणपती,त्याचबरोबर कागदाचा लगदा व शाडूची माती यांचे गणपती हे बऱ्याच अंशी पर्यावरणासाठी फायद्याचे असतात .सध्याचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे जे गणपती आपण वापरतो ते विसर्जनानंतर लवकर पाण्यात विरघळत नाहीत . त्याचबरोबर हे गणपती रंगवताना जे रासायनिक रंग वापरले जातात त्यामुळे पाण्यातील जैवविविधतेवर वाईट परिणाम होतात म्हणून शक्यतो शाडू किंवा लाल मातीचे गणपती घरी आणावेत अशा सूचना त्यांनी मुलांना दिल्या .तसेच थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर गणपती उत्सवामध्ये करू नये अशा प्रकारचे आवाहन मुलांना केले व त्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले . उदयकुमार क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले .यावेळी मुले गणपती बनवण्यात प्रचंड दंग झाली होती .अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलांनी आनंद घेत मातीचे गणपती खूप सुंदर रित्या बनवले .गणपती वाळल्यानंतर त्याचे सुंदर रंग काम केले होते .या कार्यशाळेचे नियोजन विद्यालयाचे कला विभाग प्रमुख एस .पी .पटारे यांनी केले होते .
यावेळी या कार्यशाळेसाठी विद्यालयाचे उपशिक्षक ए. ए. पाचपिंड, एस .पी .कोकाटे, एन आर .पिदुरकर, श्रीमती यु .डी . सुतार, श्रीमती एस .बी . नलवडे , श्रीमती व्ही .आर .जमदाडे ,सौ .एस .ए पाचपिंड यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप जावळे यांनी तर आभार श्रीमती एन .ए .पालवे यांनी व्यक्त केले .