महाराष्ट्रसामाजिक

धाराशिवमधील बोगस रस्ता दुरुस्तीचा पावसाने केला पर्दाफाश; महाविकास आघाडी आक्रमक, आंदोलनाचा इशारा

 

 दर्पण न्यूज धाराशिव (धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष खुणे):-
धाराशिव शहरातील प्रमुख रस्त्यांवर करण्यात आलेल्या तकलादू मलमपट्टीचे पितळ पहिल्याच पावसाने उघड पाडले आहे. राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुढे सांजा चौकापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’ झाल्याने ठेकेदाराच्या कामाचा बोगसपणा समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर, एका तरुणाचा बळी जाऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराची चांगलीच कानउघाडणी केली, तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते सांजा चौक हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून याच रस्त्यावर अनेक शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि मुख्य बाजारपेठ आहे. मात्र, रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. काही काळापूर्वी याच खड्ड्यांमुळे एका तरुण उद्योजकाला आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकरवी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. मात्र, सिमेंट काँक्रीट किंवा डांबरासारखे पक्के साहित्य न वापरता केवळ डबर आणि मुरुम टाकून खड्डे बुजवण्याची तात्पुरती मलमपट्टी केली गेली. नुकत्याच झालेल्या पावसाने ही सर्व मलमपट्टी वाहून गेली आणि खड्डे पुन्हा उघडे पडले.

या बोगस कामामुळे नागरिकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी एमएसआयडीसी (MSIDC) च्या अधिकाऱ्यांसह रस्त्याची पाहणी करत या कामाचा पंचनामा केला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे रोहित बागल, युवा सेनेचे शहरप्रमुख अभिराज कदम, सुमित बागल यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खड्डे सिमेंट काँक्रीट किंवा डांबरीकरणानेच व्यवस्थित बुजवण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!