भिलवडी येथे स्थलांतरित पूरग्रस्तांना आरोग्य, जेवणाची उत्तम सुविधा ; जनावरांवर उपचार ; लोकांमध्ये समाधान
पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना लागणारी सर्व सुविधा ; डॉक्टर चोवीस तास सज्ज

दर्पण न्यूज भिलवडी( अभिजीत रांजणे)
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी गावाला महापूराने घातलेल्या विळख्यात अनेकांची घरे पाण्याखाली गेली. आता कुठे तरी हा महापूर ओसरत आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून भिलवडी येथील सेकंडरी हायस्कूल व खाजगी प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांची प्रशासन, भिलवडी ग्रामपंचायत यांच्याकडून आरोग्य, जेवणाची उत्तम सुविधा करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना लागणारी सर्व उपचार सुविधा देण्यात येत आहेत, त्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त केले आहे.
नेहमीच संकटकाळी धावून येणारी भिलवडी गावातील मंडळी, त्याला साथ देणारी प्रशासकीय यंत्रणा यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .गेल्या तीन दिवसापासून भिलवडी परिसरात आलेल्या महापुरामुळे नागरिकांची दैना उडाली आहे. पण, भिलवडी येथील स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांची व्यवस्था अत्यंत नेटकेपणाने केली जात आहे. या मध्ये पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी, पूरग्रस्तांच्या जेवणाची सुविधा आणि पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांच्या उपचाराची सुविधा ही देण्यात येत आहे.
24 तास या पूरग्रस्तांसाठी प्रांत, तहसीलदार, बीडीओ, ग्राम विस्तार अधिकारी, सर्कल ग्रामसेवक, तलाठी आणि इतर कर्मचारी, पोलिस, वैद्यकीय अधिकाऱी, कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर, ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, माजी उपसरपंच, सदस्य, स्थानिक गावकरी मंडळी, पत्रकार बांधव मोलाचे सहकार्य करीत आहेत.
स्थलांतरित पुरग्रस्तांची होत असलेल्या सुविधामुळे या पूरग्रस्तांमध्ये समाजाचे समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आत्ता कृष्णा नदी महापूराचे पाणी ओसरू लागले आहे. मात्र,लोकांच्या भिजलेल्या घराची व्यवस्था पाहूनच त्यांना त्या ठिकाणी नेण्याची सुविधा करण्यात यावी नाही तर लोकांना आजाराला सामोरे जावे लागेल. रोगराईचा विचार करता त्याही सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी लोकातून होत आहे.