कोल्हापूर सर्किट बेंचमुळे बहुजन समाजाला लवकर न्याय मिळेल : ॲड. अतुल जाधव यांचे प्रतिपादन

कोल्हापूरः अनिल पाटील
समतावादी राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये गेले 40/45 वर्षाच्या तीव्र संघर्षानंतर सर्किट बेंच मंजूर झाले. भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांच्या हस्ते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याचे भव्य उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वकील व पक्षकार यांना याचा अतिशय आनंद झाला आहे. कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेमुळे आता बहुजन समाजाला लवकर न्याय मिळेल, ते न्यायापासून वंचित राहणार नाहीत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड. अतुल जाधव यांनी केले.
ते मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि आम्ही भारतीय महिला मंच यांच्यावतीने कोल्हापूरात सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी प्रबुद्ध भारत हायस्कूल, कोल्हापूर येथील पाचशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव शण्मुखा अर्दाळकर उपस्थित होत्या.
यावेळी आम्ही भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल म्हणाल्या, कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्यामुळे सर्वसामान्य महिलांना देखील न्याय मिळण्यास मदत होणार आहे. न्याय आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्ष साकारली जाणार आहे.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर म्हणाल्या, कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्यामुळे सामान्य नागरिकांना खूपच आनंद झाला आहे. अनेक वर्ष न्यायापासून वंचित राहिलेल्या सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तींना आता न्याय मिळणे सोपे होणार आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी सिकंदर तामगावे, किरण मधाळे, नंदकुमार पोवार, सुजाता पाटील, उषा कोल्हे, सुदर्शन मेंगाणे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी ॲड. अतुल जाधव यांच्या हस्ते पाचशे हून अधिक विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक प्रबुद्ध भारत हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार अर्दाळकर यांनी केले तर आभार धम्मदीप मस्के यांनी मानले.