क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यास दानशूर व्यक्तींनी पुढे यावे ; – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानांतर्गत सन 2025 पर्यंत देश टी. बी. मुक्त करण्याचा कालबध्द कार्यक्रम निश्चित केला आहे. क्षय रोगाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी संकल्प करून क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यास समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते निक्क्षय मित्रांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, डॉ. माधव ठाकूर यांच्यासह निक्क्षय मित्र उपस्थित होते.
YES WE CAN END T. B. होय, आपण क्षयरोग संपवू शकतो ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे, यासाठी विभागाने व्यापक जनजागृती मोहीम हाती घ्यावी. जनजागृतीसाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा, असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी याप्रसंगी सांगितले. क्षयरोग नियंत्रणामध्ये सांगली जिल्ह्याचे काम चांगले आहे. क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी ज्या-ज्या व्यक्ती मदत करीत आहेत त्यांचे इतरांनी अनुकरण करावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी व्यक्त केली. तसेच क्षय रुग्णांना पोषण आहार देऊन त्यांना मदत करीत असल्याबद्दल निक्क्षय मित्रांचे त्यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले.
जिल्ह्यातील 597 क्षय रुग्णांना निक्क्षय मित्रांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जात आहे. सांगली जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रणाचे काम चांगले होत असल्याबद्दल आज वाराणसी येथील टी. बी. परिषदेमध्ये सांगली जिल्ह्याला ब्राँझ पदक देऊन गौरवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी यांनी यावेळी दिली.
शासन क्षय रुग्णांसाठी औषधे पुरविते. औषधाबरोबरच त्याला सकस पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतूनच क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी आपण मदत करीत असल्याची भावना निक्क्षय मित्र विशाल कदम, डॉ.अजित मेहता, शरद लाड, डॉ. जितेश कदम यांनी यावेळी मनोगतात व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दालमिया भारत फाउंडेशन आरळा (100 क्षय रुग्ण पोषण आहार), शरद अरुण लाड (85 क्षय रुग्ण पोषण आहार), सुहास शिवाजीराव पाटील (50 क्षय रुग्ण पोषण आहार), डॉ. जितेश कदम (40 क्षय रुग्ण पोषण आहार), रोटरी क्लब ऑफ, तासगाव (20 क्षय रुग्ण पोषण आहार) आणि बाळासाहेब कलशेट्टी, डॉ.अजित मेहता, विशाल कदम, साहिल देवकर, शुभम देवकर, वैष्णवी देवकर (प्रत्येकी 10 क्षय रुग्ण पोषण आहार) या निक्क्षय मित्रांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.