कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

दर्पण न्यूज सांगली : कडेपूर मधील मौजे ढाणेवाडी खडीआई मंदिरच्या खालच्या बाजूला असलेल्या फॉ. कं. नं. 123 मधील राखीव वनक्षेत्रात गस्त करीत असताना दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी साधारण 2 च्या सुमारास चार संशयित इसम यांना खैर वृक्षांची तोड करून वाहतुकीच्या तयारीत असताना पकडले आहे. या प्रकरणी 28 हजार 27 रूपये किंमतीचा खैर लाकूड माल जप्त करण्यात आला आहे, असे वनविभागामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
याबाबत प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, या प्रकरणी खैर नग 35, घ.मी. 0.642 खैर जळाऊ लाकूड माल 11.000 घ.मी असा 28 हजार 27 रूपये किंमतीचा खैर लाकूड माल जप्त केला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिंदेवाडी पो. मायणी येथील योगेश विलास भिसे (वय वर्षे 31) व रूपेश विलास भिसे (वय वर्षे 36) सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी येथील रामचंद्र दादासो मोहिते (वय वर्षे 40) व रमेश पांडुरंग मोहिते (वय वर्षे 23) या आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (d), 26(1) (f) अन्वये नियतक्षेत्र कडेपूर प्रथम गुन्हा रिपोर्ट दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये रामदास वेताळ, गुरूदत्त पवार, विशाल यादव, सिध्दार्थ होवाळ हे वनकर्मचारी सहभागी होते.
या प्रकरणाचा पुढील तपास सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक (वने) नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कडेगांव – पलूस संतोष शिरशेटवार, परिमंडळ वन अधिकारी कडेपूर सुजित गवते, वनरक्षक कडेपूर माधवराव मुसळे, वनरक्षक वांगी रोहन मेसे, विशेष वनरक्षक सोनसळ गणेश करांडे, वनरक्षक सोनसळ अक्षय शिंदे करीत आहेत.
वृक्षतोडीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्याबाबत तात्काळ वनविभागास 1926 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.


