देश विदेशमाहिती व तंत्रज्ञान

इफ्फी 56 : माध्यम प्रतिनिधींना चित्रपटांची सखोल जाण देण्याचा पीआयबीचा स्तुत्य उपक्रम

56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वी पत्रकारांसाठी चित्रपट रसास्वाद शिबिर संपन्न

 

दर्पण न्यूज गोवा पणजी:- 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या- इफ्फीच्या पार्श्वभूमीवर, पत्र सूचना कार्यालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाने एफ टीआय आय- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या सहकार्याने अधिकृत माध्यम प्रतिनिधींसाठी एका विशेष चित्रपट रसास्वाद शिबिराचे आयोजन केले. मंगळवारी गोव्यात हा कार्यक्रम पार पडला. महोत्सवाचे वार्तांकन अधिक अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार होण्यासाठी पत्रकारांना चित्रपट माध्यामाचे अधिक सखोल भान देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या शिबिराचे संचालन एफटीआयआय चे प्राध्यापक डॉ. इंद्रनील भट्टाचार्य (चित्रपट अभ्यास आणि संशोधन) आणि सह प्राध्यापक वैभव आबनावे (चित्रपट दिग्दर्शन) यांनी केले. व्याख्याने, चित्रपटांचे प्रदर्शन, चर्चासत्रे आणि विश्लेषणात्मक अभ्यासाद्वारे तज्ज्ञांनी सहभागींना चित्रपटाचे स्वरूप, चित्रपट माध्यमाचा इतिहास आणि जागतिक चित्रपट निर्मितीला आकार देणाऱ्या सौंदर्यशास्त्राची ओळख करून दिली.

या सत्राला पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात कुमार आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम हे वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी चित्रपटकर्ते आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणून सुजाण माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पत्रकारांना चित्रपट कलेचे बारकावे समजल्यावर ते अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण विश्लेषण करु शकतात, यावर त्यांनी भर दिला..

कार्यक्रमाच्या शेवटी, प्रभात कुमार, प्रकाश मगदूम आणि स्मिता वत्स शर्मा यांच्या हस्ते सहभागी माध्यम प्रतिनिधींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या शिबिरामुळे चित्रपटांकडे पाहण्याचा एक नवीन आणि चिकित्सक दृष्टीकोन मिळाल्याने, हे प्रतिनिधी आता 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्यांचे वार्तांकन करण्यासाठी आणखी सज्ज झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!