ई-चलानसंदर्भात वाहतूक पोलिसांना खाजगी मोबाईल वापरास बंदी ; नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार

कोल्हापूरः अनिल पाटील
महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांनी ई-चलानसाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर थांबवावा, अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी दिला आहे.
ही कारवाई २ जुलै २०२५ रोजी विधान भवनात परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या वाहतूक संघटनांच्या बैठकीनंतर करण्यात येत आहे. बैठकीत संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधिकारी खाजगी मोबाईलवरून मोठ्या प्रमाणात वाहने चित्रीत करून, नंतर सोयीनुसार त्यावर ई-चलान काढत असल्याची तक्रार मांडली होती. या प्रकारामुळे चुकीच्या पद्धतीने दंड आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात यापूर्वीही २०२० व २०२४ मध्ये खाजगी मोबाईलचा वापर थांबवण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, अजूनही काही पोलीस त्यांचे खाजगी मोबाईल वापरत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आता यावर कठोर भूमिका घेत, अशा कर्मचाऱ्यांची ओळख पटल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना देण्यात आले आहेत.* खाजगी मोबाईलवरून वाहनांचे फोटो काढून ई-चलान काढण्यावर बंदी
* यापूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजी
* नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई अनिवार्य