भक्तीयोग हा आत्मपरिवर्तनाचा मार्ग : प्रा.राजा माळगी
भिलवडी येथे डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांचा स्मृतिदिन साजरा

दर्पण न्यूज भिलवडी : भिलवडी संपूर्ण ज्ञानेश्वरी विवेक निष्ठेवर आधारित आहे.विश्वास आणि श्रध्देने सेवा करणे म्हणजे भक्तीयोग होय.भक्तीयोग हा आत्मपरिवर्तनाचा मार्ग आहे.भक्तीची फलश्रुती म्हणजे आनंद होय.साधना शिवाय प्राप्त होणारा आनंद म्हणजे मोक्ष असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व वक्ते प्रा.राजा माळगी यांनी केले.थोर समाजसेविका व भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा कै.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्ञानेश्वरीेतील भक्तीयोग या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांच्या समाधीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संस्थेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.यापुढे बोलताना प्रा.राजा माळगी म्हणाले की, डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांनी कर्मयोगाचे माध्यमातून केलेल्या कामाची ठिकाणे तीर्थक्षेत्रे बनलीत.भिलवडी शिक्षण संस्था ही आदर्श मूल्ये घेऊन काम करणारी संस्था आहे. त्याग आणि समर्पण वृत्तीने शिक्षण क्षेत्रात काम करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्राचार्य डॉ.सुरेश शिंदे यांनी पाहुणे परिचय केला. सहसचिव के.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय तेली यांनी आभार मानले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे, अशोक चौगुले, संचालिका लीना चितळे,संचालक महावीर वठारे,चंद्रकांत पाटील,प्रा.धनंजय पाटील,संभाजी सूर्यवंशी,सदाशिव तावदर,मुकुंद जोग,मुख्याध्यापक संजय मोरे,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी,श्रेयस पाटील आदींसह भिलवडी व परिसरातील मान्यवर,पालक, आजी माजी विद्यार्थी,विजेते स्पर्धक उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.