महाराष्ट्र

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

 

 

            मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. जाणून घेऊया या योजनेबाबत….

 

योजनेची उद्दिष्टे

मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे. मुलीच्या शिक्षणास चालना देणे. मुलीचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे. कुपोषण कमी करणे. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

या योजनेअंतर्गत अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रूपये, अकरावीत 8 हजार रूपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रूपये याप्रमाणे एकूण 1 लाख 1 हजार रूपये एवढी रक्कम देण्यात येईल.

 

अटी व शर्ती

ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता / पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे.

 

आवश्यक कागदपत्रे

        लाभार्थीचा जन्माचा दाखला. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे, याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील). पालकाचे आधार कार्ड. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.  रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत). मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला). संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied). कुटुंब नियोजन शस्रक्रिया प्रमाणपत्र. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र).

 

लाभ घेण्याची कार्यपध्दती

या योजनेअंतर्गत लाभासाठी 1 एप्रिल 2023 रोजी वा तद्‌नंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

 

                                                 (संकलन  – श्री. शंकरराव पवार, जिल्हा माहिती कार्यालय, सांगली)

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!