महाराष्ट्रराजकीयसामाजिक

दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड विशेष मोहीम राबवणार ;    जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

     दर्पण न्यूज  सांगली : दिव्यांग नागरिकांना शारीरिक, बौद्धिक, मानसिक मर्यादा असल्या तरी ते समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत. या अनुषंगाने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे पुनर्वसन आवश्यक आहे. त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या युडीआयडीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात यासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, we फाऊंडेशन पुणे सीईओ दिनेश कदम, जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, यांच्यासह मूकबधीर शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी आदि उपस्थित होते.

आतापर्यंत नोंदणी झालेल्या दिव्यांगांना युडीआयडी देण्यासाठी महिनाभरात विशेष मोहीम हाती घ्यावी, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिव्यांग नागरिकांसाठी आगामी पाच वर्षांसाठी व्हिजन डॉक्युमेंट करावे. त्यात जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना टप्पेनिहाय प्रगतीच्या मार्गावर आणण्याचे नियोजन करावे. त्याचे बीजारोपण युडीआयडी कार्ड विशेष मोहिमेतून होईल. यासाठी वेळापत्रक आखून तालुकानिहाय शिबिरे आयोजित करावीत. ग्रामीण स्तरावर आशा स्वयंसेविकांमार्फत संबंधितांना शिबिराची व शिबिरात आणावयाच्या कागदपत्रांची माहिती द्यावी. युडीआयडी कार्ड मिळाल्यानंतर दिव्यांग नागरिक विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील. तसेच, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, याचबरोबर नवतंत्रज्ञानाची ओळख होण्याच्या दृष्टीने कर्णबधीर विद्यार्थ्यांना ए. आय आणि रोबोटिक्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर कै. रा. वि. भिडे मूकबधीर शाळा, मिरज येथील 75 विद्यार्थ्यांना 14 दिवस दर दिवशी तीन तासांचे प्रशिक्षण देण्यात येईल. नवतंत्रज्ञानाच्या वापराने दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी असणारे अडथळे दूर होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. युडीआयडी कार्डची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्डवितरणावेळी पात्र दिव्यांग नागरिकांना संजय गांधी निराधार योजनांसारख्या अन्य योजनांचे अर्ज द्यावेत. सदर अर्ज भरल्यानंतर त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य होईल, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

जिल्ह्यात नेत्रदानाची चळवळ रूजवण्याचे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या दृष्टीने जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिक संघटनांची बैठक आयोजित करावी. नेत्रहीन मुलांकडून नेत्रदानासाठी आवाहन घेऊन प्रबोधन करावे. यामध्ये नेत्र नसल्याने होणारा त्रास व नेत्र मिळाल्यानंतर काय फायदा होईल, याचे कथन सदर बालकांनी करावे. त्यातून नेत्रदान करण्यास सांगलीकर नागरिकांना प्रवृत्त करावे. त्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!