भिलवडी चितळे उद्योगसमूहांच्या पद्मजा चितळे (काकू) यांचे निधन
चितळे उद्योगसमूहाचे आधारवड नानासाहेब तथा परशुराम चितळे यांच्या सुविद्य पत्नी तसेच उद्योजक श्रीपाद चितळे, भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, अनंत चितळे यांच्या मातोश्री होत

दर्पण न्यूज भिलवडी :- चितळे उद्योगसमूहाचे आधारवड नानासाहेब तथा परशुराम चितळे यांच्या सुविद्य पत्नी तसेच उद्योजक श्रीपाद चितळे, भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, अनंत चितळे यांच्या मातोश्री कै. सौ. पद्मजा चितळे (काकू) (वय ८५) यांचे दिनांक ९ जुलै २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने भिलवडी परिसरासह संपूर्ण शेती, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सौ. पदमजा चितळे या केवळ घरगुती जीवनापुरत्या मर्यादित न राहता एक उत्कृष्ट प्रयोगशील महिला शेतकरी, समाजसेविका आणि शिक्षिका म्हणून परिचित होत्या. त्यांचा जन्म २ जानेवारी १९४० रोजी झाला होता. त्यांनी एम.टी.सी., बी.पी.एड. अशी उच्चशिक्षण घेतले होते. त्याकाळात त्यांनी दोरीच्या मल्लखांबात प्राविण्य मिळविले होते.
त्यांनी पती नानासाहेब चितळे यांच्या सोबत १९७८ साली तांदळाच्या सुधारित जातींवर प्रयोग सुरू केला होता. तसेच द्राक्ष पिकातही वेगवेगळे प्रयोग केले होते. तास-ए-गणेश जातीवर आधारित प्रयोगामुळे त्यांना २००० व २००३ मध्ये ऑल इंडिया स्तरावर प्रथम क्रमांक आणि विविध राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी शेतीसोबतच शेतमाल प्रक्रियेबाबतही नवे प्रयोग राबवले. गुलाबशेती पेरू बाग सह विविध शेती उत्पादनांचे उत्तम यशस्वी दिशादर्शक प्रकल्प राबविले.
२४ जानेवारी २००९ रोजी दिल्ली येथे भारतीय ब्राह्मण संमेलनात “ब्राह्मणरत्न” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान झाला होता. महिला असतानाही फळबाग, डाळी, तांदूळ, भात, भाजीपाला व मसाले उत्पादन क्षेत्रातही अत्यंत उल्लेखनीय कार्य त्या शेवटपर्यंत करत राहिल्या.
शेतीतले प्रयोग स्वतः पुरते मर्यादित न ठेवता
आपलया अनुभवातून अनेक शेतकरी, महिला व विद्यार्थी घडवले. शेतीत केलेल्या कामाच्या योगदानाची दखल घेत इंडियन अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (IARI) व इतर संस्थांनी गौरव केला होता. भिलवडी स्टेशन सारख्या ग्रामीण भागातील गावात चितळे डेअरीच्या उभारणीच्या पती नानासाहेब चितळे यांनी दीर काकासाहेब चितळे यांच्या सह मोठे योगदान दिले आहे. उद्योगामध्ये पद्मजा ताईनी नानासाहेबांना उत्तम साथ देत एकाबाजूने व्यवसायांमधील शिस्त सांभाळणे, डेअरीच्या कामनिमित्त बाहेरून आलेल्या व्यक्तींचे आदरातिथ्य करणे आदी बाजू भक्कम पणे सांभाळल्या.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या कन्या डॉ. मनीषा दावलभक्त या भुसावळ येथे स्त्रीरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. उद्योजक गिरीश चितळे मकरंद चितळे यांच्या त्या काकू होत. तर निखिल चितळे अतुल चितळे, पुष्कर चितळे, रोहन चितळे यांच्या त्या आजी होत.
चितळे कुटुंबावर ओढावलेल्या या दुःखद प्रसंगी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.