साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील योजनांसाठी अर्ज मागणी

दर्पण न्यूज सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) सांगली यांच्यामार्फत मातंग व तत्सम 12 पोटजातीतील गरजुंसाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना व थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली येथील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल. ए. क्षीरसागर यांनी केले आहे.
मातंग, समाजातील 12 पोटजातीतील अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनमादींग, मादींग, दानखणीमांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या जातीतील लोकांना अर्ज करता येतील. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनेंतर्गत 50 उद्दिष्ट, बीजभांडवल योजनेंतर्गत 50 उद्दिष्ट व थेट कर्ज योजनेंतर्गत 50 उद्दिष्ट त्यामध्ये अनुदान योजनेंतर्गत 50 हजार रूपयेपर्यंत व्यवसायांना कर्ज देण्यात येते. यामध्ये 40 हजार रूपये बँक कर्ज व 10 हजार रूपये अनुदान रक्कम आहे.
बीजभांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार 1 रूपये ते 7 लाखापर्यंत आहे. 50 हजार 1 रूपये ते 7 लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रूपये अनुदान वगळता उर्वरित कर्जात 5 टक्के अर्जदारांचा सहभाग, 45 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रूपये अनुदानासंह) व 50 टक्के बँकेची कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे. बीज भांडवल योजनेचे केवळ 50 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट असल्याने अर्ज मागविण्यात येत आहेत. थेट कर्ज योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा एक लाख रूपये पर्यंत आहे. एक लाख रूपये पर्यतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रूपये अनुदान, 85 हजार रूपये कर्ज व 5 हजार रूपये लाभार्थी सहभाग आहे.
या योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थीस एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल. सांगली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील गरजूंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून घेवून जिल्हा कार्यालयात जमा करावेत. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.