सांडगेवाडी येथील जागा पारधी समाजाला द्या : आरपीआयचे विशालभाऊ तिरमारे
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : RPI चा इशारा

दर्पण न्यूज पलूस :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील पारधी समाजाला तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सोमवार दि.२३ जून पासून पलूस तहसीलदार कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल भाऊ तिरमारे, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मुन्नाभाई कोकणे, विधानसभा उपाध्यक्ष, शितल मामा मोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दीप्ती रिठे मॅडम यांना देण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजेश तिरमारे प्रमुख उपस्थित होते. सांडगेवाडी येथील पारधी समाजाचे कुटुंबीय व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की पारधी समाजाची दोन कुटुंबे सांडगेवाडी येथे आहेत. त्यांना गेली कित्येक वर्ष जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गोरगरीब पारधी समाजातील दोन कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी 2018 पासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याप्रसंगी सामाजिक संघटनांना घेऊन तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात आली आहेत. तसेच निवेदनेही देण्यात आली आहेत. निवेदनाच्या व आंदोलनाच्या अनुषंगाने तहसीलदार पलूस यांनी 06/02/2024 रोजी पारधी कुटुंबांना गट नंबर 06 मधील जागा मोजून प्रत्येकी 2 गुंठे जागा देण्यात यावी असे गटविकास अधिकारी व उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, ग्रामपंचायत सांडगेवाडी यांना पत्रव्यवहार केला होता. परंतु संबंधित ग्रामपंचायत किंवा आपल्या कार्यालयाकडून गेली दोन वर्ष या कुटुंबाला न्याय देण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
पारधी कुटुंब हक्काची जागा नसल्यामुळे भयभीत स्वरूपात अतिशय हालाखीच्या परिस्थितीत पावसामध्ये झोपडी घालून सांडगेवाडी येथे राहात आहे. महिला व लहान मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. आपण या तालुक्याचे प्रमुख अधिकारी म्हणून या पारधी कुटुंबाविषयी संवेदनशील भूमिका घेऊन तात्काळ या कुटुंबाला जागा उपलब्ध करून द्यावी. सदर सांडगेवाडी मधील गायरान व एमआयडीसीची जागा मोजणी झालेली आहे. त्यामुळे या कुटुंबाना गायरान मधील तात्काळ जागा देण्यास कोणतीही हरकत नाही. आपण संबंधित विभागांना सूचना करून या कुटुंबांना जागा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समस्त पारधी कुटुंबियांना घेऊन तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक 23/06/2025 पासून बेमुदत धरणे आंदोलन/आमरण उपोषण किंवा थाळीनाद आंदोलन करणार असल्याचा इशारा विशालभाऊ तिरमारे यांनी दिला आहे