आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयासह सीपीआर मधील कामे गतीने पूर्ण करा ; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

 

  दर्पण न्यूज कोल्हापूर – शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच शहरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात सुरू असलेली कामे गतीने व गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

 

या कामांची अंमलबजावणी करताना संबंधित बांधकाम विभाग तसेच प्रत्येक विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

 

या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, कागल येथील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, सांगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) बी. एल. हजारे आदी अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘कामकाजाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावा, परिसराचे सुशोभीकरण करा आणि आजूबाजूचे गवत, माती, घाण साफसफाई करून परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवा.’

 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, सध्या विविध इमारतींची दुरुस्ती व डागडुजी सुरु आहे. काही नव्या सुविधा देखील निर्माण होत आहेत. हे सर्व करत असताना रुग्णसेवा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. संबंधित विभागांमध्ये काम सुरू असतानाही रुग्णांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

 

रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या शेडचा वापर रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी बसण्याच्या जागेसाठी करावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच लिफ्टचे काम तातडीने पूर्ण करा आणि परिसरातील ड्रेनेज व अंतर्गत रस्त्यांचे कामही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

यावेळी सांगाव, पिंपळगाव येथील होमिओपॅथी महाविद्यालय व उत्तूर येथील योग व निसर्गोपचार रुग्णालयाबाबतही आढावा घेण्यात आला.

 

महत्त्वाची कामे व प्रगतीची माहिती:

• आतील रस्ते, गटर, फुटपाथ: 11 कोटी 26 लाख रुपयांच्या निविदेतील 90% काम पूर्ण.

• सपाटीकरण व सुशोभीकरण: 9 कोटींचे स्थापत्य काम प्रगतीपथावर.

• खेळ सुविधा: 3 कोटी 22 लाखांत बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्ट; रुफिंगचे काम सुरू.

• फॉरेन्सिक विभाग इमारत: 7 कोटी 28 लाखांच्या कामास सुरुवात; सध्या खोदाई सुरू.

• निवासी डॉक्टर वसतिगृह (पुरुष): 23 कोटी 86 लाखांचे काम; तळमजल्याचे कॉलमचे काम प्रगतीपथावर.

• निवासी डॉक्टर वसतिगृह (महिला): 23 कोटी 76 लाख; काम प्रगतीपथावर.

• परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह: 20 कोटी; कामास सुरुवात.

• 150 मुलांचे वसतिगृह: 15 कोटींचे बांधकाम सुरू.

• 150 मुलींचे वसतिगृह: 17 कोटी 98 लाख; ग्राउंड फ्लोअरचे काम प्रगतीपथावर.

आवश्यक फर्निचरची निविदा प्रक्रिया सुरू.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!