लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे 14 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रविण नरडेले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एन. के. आपटे, तहसिलदार डॉ. अर्चना पाटील यांच्यासह निवडणूक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही (Nothing like voting, I vote for sure) असे या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे घोषवाक्य आहे.
भविष्याचा विचार करून प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून ती सर्व तहसिल कार्यालयामध्ये तसेच ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर पाहता येईल. मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री प्रत्येकाने करावी. जर मतदार यादीत नाव नसेल तर फॉर्म 6 भरून नाव नोंदणी करावी, नाव कमी करण्यासाठी फॉर्म 7 भरावा, पत्ता बदल करण्यासाठी फॉर्म 8 भरावा, असे सांगून त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली म्हणाले, निर्भयपणे मतदान करण्यासाठी वातावरण निर्मितीचे काम प्रशासन करेल. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे. मतदान हे कर्तव्य समजून विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अर्जुन पाटील, ऋतिका डिस्कळकर, आदर्शराज यादव या विद्यार्थ्यांनी तसेच अमन पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मुख्य निर्वाचन आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाचे प्रक्षेपण व मतदार जनजागृती विषयी चित्रफीत दाखविण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्लवन करण्यात आले. निता शिंदे-सावंत यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाबाबत प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रम प्रसंगी निरंतर पुनरिक्षण व संक्षिप्त कार्यक्रमात उत्कृष्ट काम केलेले बी.एल.ओ., वंचित घटक व नवमतदार नोंदीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या सेवाभावी संस्था / महाविद्यालय, मतदार दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला, भिंतीचित्र, रांगोळी, घोषवाक्य, वक्तृत्व, निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटपही करण्यात आले.
प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा हेतू विशद केला. सूत्रसंचालन मंडल अधिकारी पंडित चव्हाण यांनी केले. आभार प्राचार्य एन. के. आपटे यांनी मानले.