मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील वयाची व चार चाकी वाहना संदर्भातील अट रद्द करा ; आरपीआयची मागणी

पलूस : महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांच्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना ०१ जुलैपासून अमलात आणली आहे या योजनेमध्ये वयाची व चार चाकी वाहनांची अट घातल्यामुळे गरजू व वयोवृद्ध महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही यामुळे वयोवृद्ध महिला व चार चाकी वाहनधारकांच्या मनात या योजनेबद्दल असंतोष असल्यामुळे या अटी तात्काळ रद्द करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल (भाऊ) तिरमारे व पलूस तालुकाध्यक्ष बोधिसत्व (नाना) माने व शिष्ठमंडळांने पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिटे यांच्या मार्फत दिले.यावेळी आरपीआयचे मुस्लिम आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर विधानसभा उपाध्यक्ष शितल मामा मोरे, सागर महापुरे, सागर तिरमारे,अजिंक्य तीरमारे, आर्यन तिरमारे उपस्थित होते.
निवेदनात लिहिले आहे की, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वागत करीत आहोत. परंतु सर्वसामान्य वयोवृद्ध महिलांच्या या योजनेसंदर्भात आमच्या पक्षाकडे अनेक तक्रारी महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असताना आपण घातलेल्या अटीमुळे ६५ वर्षापुढील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही अट वयोवृद्ध महिलांच्या वर अन्याय करणारी आहे.६५ वर्षाच्या पुढील महिला वयोवृद्ध व आजारपणाने त्रस्त असतात. कौटुंबिक परिस्थिती त्यांची खूप हलाखीची असते. वयोवृद्ध महिलांना त्यांच्या स्वखर्चासाठी सदैव पैशाची चणचण भासत असते त्यामुळे या सर्व महिलांना सरसकट पंधराशे रुपये मिळाले तर त्यांना म्हातारपणात आपल्या शासनाचा मोठा आधार मिळेल.
त्याचप्रमाणे एकाच घरातील फक्त दोन महिलांना लाभ दिला जाईल हे चुकीची आहे. त्यामुळे योजना चांगली असली तरी या अटीमुळे आपल्या योजनेच्या बद्दल महिलांच्या मनात आपल्या सरकारच्या बद्दल तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे.ज्या पद्धतीने ट्रॅक्टर वाहन असणाऱ्या कुटुंबाला या योजनेतून सूट देण्यात आलेली आहे तशीच सूट चार चाकी वाहनधारकांनाही देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही करीत आहोत. सरसकट महिलांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी प्रमुख मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आम्ही करित आहोत. वेळप्रसंगी पक्षाच्या वतीने वयोवृद्ध महिलांना घेऊन पक्षाच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.