आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

घरेलू कामगार निरोगी होण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरातून मदत ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली मालू हायस्कूल येथे घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान उद्घाटन

 

 

 

सांगली : घरातील महिला निरोगी राहिली तर भावी पिढी निरोगी राहते. निरोगी महिला कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतात. या अनुषंगाने घरेलू कामगार महिला हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक निरोगी, सुदृढ राहण्यास आरोग्य तपासणी शिबिरातून मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

सांगली जिल्हा प्रशासकीय गतिमानता घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मालू हायस्कूल येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, सांगली शहरच्या पोलीस उपअधीक्षक विमला एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, सहायक आयुक्त, कामगार कल्याण मुजम्मिल मुजावर, सहायक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

घरेलू कामगार हा इतरांची सेवा करणारा व त्या माध्यमातून अनेकांचे कुटुंब चालविणारा वर्ग आहे. मात्र, पैसे व वेळेअभावी घरेलू कामगार महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वर्गातील महिलांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून केली जात आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अशा कामगारांची नोंदणी केली जाते. त्यांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. नोंदणी झालेल्या घरेलू कामगार महिलांची आजच्या शिबिरात आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर गरजेप्रमाणे मुख्यमंत्री सहायता कक्ष, आयुष्मान भारत, धर्मादाय रुग्णालय आदि माध्यमातून उपचार केले जाणार आहेत. अधिक गरज भासली तर आपणही विविध कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही मदत उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.

पुरेशी विश्रांती, सकस आहारअभावी महिलांच्या आरोग्याची हेळसांड होते. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर महिलांना विविध आजार उद्भवतात. यावर मात करण्यासाठी पुण्यात राबवण्यात आलेल्या सुखदा उपक्रमाचा दाखला देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते कोल्हापूरचे पालकमंत्री असताना पाच लाख बालकांची आरोग्य तपासणी व शंभरहून अधिक बालकांवर लाखो रुपये खर्च असलेल्या ह्रदय शस्त्रक्रिया पालकांचे भोजन, निवासाच्या सुविधेसह मोफत करण्यात आल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संवेदनशील संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याबद्दल कौतुक करुन घरेलू कामगार महिला आजारमुक्त होईपर्यंत पाठपुरावा करावा. त्याचबरोबर आजार होऊ नये म्हणून, आजार झाल्यावर व आजारातून बरे झाल्यावर घ्यावयाची काळजी व आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शनानुसार पूरक आहार याबाबतही अशा शिबिरातून मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सूचित केले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, घरेलू कामगार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्या सर्वांचे आयुष्य त्यांच्या मुलांभोवती, कुटुंबाभोवती गुंफले आहे. त्यामुळे आरोग्य तपासणीच्या माध्यमातून घरेलू कामगार सुदृढ राहण्यास मदत होणार आहे. यासाठी धर्मादाय रुग्णालये व कामगार संघटनांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच या शिबिरात विविध तपासण्या होणार असून, तपासणी झालेल्या महिलांचे गंभीर आजार ते निरोगी अशा चार प्रकारात वर्गीकरण करून आवश्यकतेप्रमाणे आगामी चार महिने उपचार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून वैष्णवी साहेबराव भोसले हिला घशामध्ये छिद्र या आजारावर उपचार करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 40 हजार रुपयांची मदत करण्यात आली. यासाठी कक्षाच्या समन्वयक डॉ. मनिषा पाटील यांनी समन्वय केला.

यावेळी डॉ. विक्रमसिंह कदम, प्रियांगिनी पाटील व मुजम्मिल मुजावर यांनी मार्गदर्शन केले. स्वागत डॉ. विक्रमसिंह कदम यांनी तर निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी आभार मानले.

जिल्हाधिकारी कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यगीत गायनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. धन्वंतरी देवता व छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास महसूल विभाग, आरोग्य विभाग व कामगार कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, घरेलू कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!