महाराष्ट्रसामाजिक

संविधान दिनापासून संघर्ष, मानवी हक्क दिनी आमरण उपोषण ;बँक प्रशासनावर आरोप

. राहुल इनकर, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, पुणे जिल्हा

 

दर्पण न्यूज पुणे :युनियन बँक ऑफ इंडिया प्रशासनाच्या अन्यायकारक, हुकूमशाही व अमानवी कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, पिडित कर्मचारी श्री. ऋषिकेश राजू कांबळे यांच्या न्यायासाठी सुरू असलेले आमरण उपोषण आज सहाव्या दिवशी पोहोचले आहे. बँक प्रशासनाच्या दडपशाही धोरणांमुळे एका गरीब कर्मचाऱ्याला स्वतःच्या जिवाची बाजी लावण्याची वेळ येणे, ही अत्यंत गंभीर व लज्जास्पद बाब असल्याचे मत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, पुणे जिल्हा यांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात जिल्हाध्यक्ष मा. राहुल इनकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन, मा. सुभाष कुमार केशव, झोनल मॅनेजर, युनियन बँक ऑफ इंडिया, पुणे झोन यांना कडक व जाहीर इशाऱ्याचे लेखी निवेदन सादर केले.
युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा – अंकली (ता. मिरज, जि. सांगली) येथे कार्यरत असलेले पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही विभागीय चौकशी न करता, तसेच कायदेशीर प्रक्रिया डावलून तडकाफडकी कामावरून काढून टाकले. हा प्रकार केवळ कामगार कायद्यांचाच नव्हे, तर भारतीय संविधान, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचा उघड भंग असल्याचा गंभीर आरोप युनियनने केला आहे.
न्याय, हक्क व अधिकार मिळावेत यासाठी पिडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांनी 26 नोव्हेंबर – संविधान दिनापासून लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मात्र, अनेक दिवस आंदोलन सुरू असतानाही युनियन बँक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. अखेर बँक प्रशासनाच्या या निर्दयी, असंवेदनशील आणि अमानवी भूमिकेच्या निषेधार्थ 10 डिसेंबर – जागतिक मानवी हक्क दिनापासून ऋषिकेश कांबळे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे.
निवेदनात स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले की, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या गरीब कर्मचाऱ्याला बेकायदेशीररीत्या बेरोजगार करून त्याला आमरण उपोषणास बसण्यास भाग पाडणे, ही युनियन बँक प्रशासनाची क्रूर मानसिकता दर्शवते. सलग सहाव्या दिवशी ग्रामीण पोलीस निरीक्षक सांगली यांच्या मध्यस्थीने पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना, गेले पाच वर्षांत काम केलेले थकित किमान वेतन व बोनस फरक देण्याचे युनियन बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंट प्रशासनाने कबूल केले असल्याने दिनांक १५/१२/२०२५ रोजी काही अटी शर्ती वर तात्पुरते आमरण उपोषणाला स्थगिती दिली आहे. परंतु आंदोलन संपले नाही, पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना कामावर कायम रूजू करून घेवू पर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. त्याचबरोबर आंदोलन दरम्यान पिडित कर्मचाऱ्याच्या प्रकृतीस काहीही विपरीत झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक व कायदेशीर जबाबदारी, युनियन बँक शाखा अंकली शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे तसेच प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
तसेच, ऋषिकेश कांबळे यांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे, सर्व थकीत वेतन व हक्क द्यावेत, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सचिन शेलार, बालकनाथ शिरसाट, ईश्वर तायडे, महादेव कावळे, रामभाऊ कुव्हारे, प्रकाश साठे, अकबर शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने युनियन बँक प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांचा तीव्र निषेध करत, पिडित कर्मचाऱ्याला तात्काळ न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी केली.
जर तात्काळ न्याय दिला गेला नाही, तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील युनियन बँक ऑफ इंडिया शाखांसमोर लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, आणि त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास युनियन बँक मॅनेजमेंट व महाराष्ट्र शासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!