पलूस महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात

दर्पण न्यूज सांगली : तहसील कार्यालय पलूस व अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “जागतिक ग्राहक हक्क दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तहसील पुरवठा विभाग निरीक्षण अधिकारी श्रीमती आत्राम, प्राचार्य डॉ. आर. एस. साळुंखे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा सर्जेराव सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी तहसील पुरवठा विभाग निरीक्षण अधिकारी श्रीमती आत्राम यांनी जागतिक ग्राहक हक्क दिनाचे महत्त्व विषद करून विद्यार्थी ग्राहकांनी खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. आर. एस. साळुंखे यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील विविध तरतुदी, ग्राहक न्यायालयाची रचना इत्यादीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा अध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी यांनी भारत सरकारची जागतिक ग्राहक दिनाची संकल्पना “A just transition to sustainable Life style”…. “शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय्य संक्रमण” या विषयावर मार्गदर्शन केले. आरोग्य, आहार, ऊर्जा बचत, निसर्गरक्षण, प्रवास व मोबाईल वापराबाबत सविस्तर माहिती सांगून शाश्वत जीवनशैली कशी विकसित करावी याचे सखोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक प्रा. सुनील जोशी यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका शुभांगी पाटील यांनी केले, आभार प्राध्यापिका रोहिणी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सौ. निकम यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.