अवयवदान मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली जिल्ह्यातील अवयवदात्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला
दर्पण न्यूज सांगली : अवयवदान हा वैद्यकीय उपचार नाही तर तो मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श आहे. अवयवदानासाठी जनजागृती करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील अवयवदात्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारंगकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजचे उपअधिष्ठाता डॉ. अहंकारी, नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे आदि उपस्थित होते. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मानवता अजून जिवंतच नाही तर ती संजीवन आहे. मानवतेमध्ये सुध्दा परमेश्वर आहे. अवयवदान केलेल्या कुटुंबियांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी केव्हाही कार्यालयात भेटावे, असे आवाहन करत त्यांनी यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या दु:खातही धीर धरून अवयवदानाचा निश्चय करून एखाद्याचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न केलेल्या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांचे कौतुक केले.
प्रास्ताविकात डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, संकट व दु:खाच्या काळात मृत व्यक्तिच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम केले असून एक चांगला पायंडा जिल्ह्यात पाडला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अवयवदान केलेल्या ब्रेन डेड व्यक्ती रामानंद मोदानी, शिवाजी गणपती नाईक, नितीश कुमार पाटील, राजनंदिनी संतोष पाटील, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, ललिता सदगोंडा पाटील यांचे कुटुंबीय तसेच नेत्रदान केलेल्या व्यक्ती कृष्णा दत्तात्रय खडके, यश दयानंद जाधव, द्रौपदी शिवाजी जाधवच, अजित उडगवे, सौरभ माळी यांच्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तसेच अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रिया केलेल्या सेवासदन हॉस्पिटल मिरज, उष:काल हॉस्पिटल सांगली, भारती हॉस्पिटल मिरज, अनुराधा व नंदादीप नेत्र रूग्णालये यांचे डॉक्टर व पथकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ताराबाई परांजपे हॉस्पिटलचे डॉ. शेखर परांजपे, डॉ. हेमा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील अवयवदाते, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच अवयवदात्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी अवयवदानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आणि अवयवदात्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन स्वाती पाटणकर यांनी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी आभार मानले.