महाराष्ट्रसामाजिक

मुंबई येथे जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न

 

दर्पण न्यूज मुंबई :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पाश्वभूर्मीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दि.13 एप्रिल रोजी ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले. प्रथमच देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झालेली ही ऐतिहासिक पदयात्रा ही राष्ट्रीय उत्सवाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली.मुंबईतील पदयात्रेचे नेतृत्व केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले. या पदयात्रेमध्ये 2000 पेक्षा अधिक मायभारत च्या विविध स्वयंसेवकांनी भाग घेतला. ही पदयात्रा नरिमन पॉईंट येथून सुरू होऊन मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत झाली. ही पदयात्रा सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचे प्रतीक ठरली.

       यावेळी आयोजित कार्यक्रमात श्रीमती खडसे म्हणाल्या, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. या थोर महापुरुषाने आपल्या देशाला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी समाजाला नवदिशा दिली, याचा अभिमान आपल्याला आहे. त्यांची जयंती साजरी करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणं आणि पुढे नेणं हे अधिक महत्त्वाचं आहे.”

            यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, आमदार आणि युवकांचा सत्कार करण्यात आला. पदयात्रेत डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मांडणारे ‘श्रद्धांजली कोपरे’, सामाजिक न्यायावर आधारित थेट रस्त्यांवरील सांस्कृतिक सादरीकरण, आणि ‘प्रतिज्ञा बिंदू’ यांसारख्या उपक्रमांनी वातावरण अधिक प्रेरणादायी केले. कार्यक्रमाचा समारोप मंत्रालयाजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सामूहिक स्वच्छतेने करण्यात आला. ही प्रतीकात्मक क्रिया देशभरात विविध शहरांमध्येही पार पडली. जिल्हास्तरावर देखील स्वच्छता उपक्रम आणि पुष्पांजली  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.‘जय भीम पदयात्रा’ ही भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून सुरू झालेल्या 24 मासिक पदयात्रांपैकी नववी पदयात्रा होती. या पदयात्रा भारतीय युवांना  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांशी जोडण्याचे माध्यम ठरत आहेत.    मुंबईतील या पदयात्रेमध्ये  कौशल्य ,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा येथील एनवायकेसचे राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे, एएसएसचे महाराष्ट्र प्रादेशिक संचालक अजय शिंदे तसेच क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने देशभरातील तरुणांना या प्रेरणादायी चळवळीत सहभागी होण्यासाठी www.mybharat.gov.in या मायभारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले असून, लोकशाही, स्वाभिमान आणि ऐक्याच्या मार्गावर एकत्र चालण्याचे आवाहनही केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!