सांगली येथे समता पंधरवडानिमित्त जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन वेबीनार संपन्न

दर्पण न्यूज सांगली: समता पंधरवडा दि. 1 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील, डिप्लोमा तृतीय वर्षातील, सीईटी देणारे सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने ऑनलाईन वेबीनारचे आयोजन केले होते.
यावेळी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) प्रतिभा इंगळे, उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते, प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) प्रतिभा इंगळे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता व उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले व वेळेत समिती कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज सादर करण्याचेआवाहन केले.
प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, सहाय्यक संशोधन अधिकारी ओंकार कुर्ले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान होण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन केल्याचे सांगून जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची, जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेची, ऑनलाईन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी इत्यादीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व उपस्थितांच्या सर्व शंकांचे, अडचणींचे निरसण केले.
हेमलता ठोंबरे यांनी आभार मानले. या ऑनलाईन वेबीनारास महाविद्यालयाचे प्राचार्य, जात पडताळणीचे कामकाज करणारे महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.