सांगली येथे सामाजिक समता सप्ताह निमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करणे व त्यांच्या सामाजिक कार्याविषयी व्याख्यान तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सांगली येथे करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, संतोष कदम, वैष्णवी जाधव, तुषाल शिवशरण आदि उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी महापुरूषांच्या विचारांचा दैनंदिन जीवनात वापर करुन समाजासाठी उपयोगी कार्य करण्याचा व स्वावलंबी बनण्याचे आवाहन करून कर्मवीर दादासाहेव गायकवाड सबळीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
संतोष कदम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांविषयी लिहिलेल्या “शेतकऱ्याचा आसुड” या पुस्तकाचे सर्वानी वाचन करावे असे सांगितले.
आश्रमशाळा कसबे डिग्रज ची माजी विद्यार्थीनी कु. वैष्णवी जाधव यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी केलेले कार्य व त्यांच्या सामाजिक कार्याबाबत माहिती सांगितली.
प्रारंभी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवर, कर्मचारी, नागरीक यांनी सामूहिक उद्देशिका वाचन केले. या कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी, आश्रमशाळेचे कर्मचारी, तालुका समन्वयक, बार्टीचे समतादूत, नागरिक उपस्थित होते.