आरोग्य व शिक्षणग्रामीणमहाराष्ट्र

सांगली जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक ;माझ्या गावचा धडा उपक्रम पथदर्शी

 

दर्पण न्यूज सांगली :  सांगली जिल्हा परिषद उमेद अंतर्गत चांगले काम सुरू आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तुंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सोशल मीडिया, पोर्टल वापरून त्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रोजेक्शन करावे. उमेद अंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांनी जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे कोणतेही एक उत्पादन तयार करावे. त्याचा ब्रँड तयार करावा. त्यानंतर त्याचे जिल्हा व तालुका स्तरावर युनिट सुरू करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत आढावा व जिल्हा परिषदेच्या विविध लोकोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकशाहीत जिल्हा परिषद हा एक महत्वाचा घटक आहे. सांगली जिल्हा परिषदेने उमेद, जटायू व वरदान अशी तीन पोर्टल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या सहकार्याने विकसित केली आहेत, याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थविरोधी उपक्रम, सलाम बाँबे स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने 100 टक्के तंबाखूमुक्त शाळा उपक्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जीवन सुरक्षा ठेव योजना, ड्रोनव्दारे खते, औषधे फवारणीबाबतची योजना अशा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत आहेत, ही बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे लिक्वीड फर्टिलायझर आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचतात, ड्रोनच्या सहाय्याने खते व औषध फवारणी अशी मोठी क्रांती आलेली आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे प्रत्येक गोष्टीत मोठी क्रांती घडते, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अमली पदार्थविरोधी उपक्रमामध्ये निबंध, जिंगल, लघुचित्रफीत, पोस्टर आदि स्पर्धा घेतल्या. नशामुक्तीसाठी हे मोठे माध्यम ठरणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा हा तंबाखूमुक्त शाळा जिल्हा म्हणून जाहीर केला. राज्यात जळगावनंतर सांगली हा दुसरा तंबाखूमुक्त शाळा जिल्हा ठरला आहे. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत घेतलेल्य विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तीन नाविन्यपूर्ण पोर्टलचे उदघाटन
जिल्हा परिषदेने उमेद, जटायू व वरदान अशी तीन पोर्टल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या सहकार्याने विकसित केली आहेत. या तीन्ही पोर्टलचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता बचतगटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन व विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उमेद हा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसीत करण्यात आला आहे. नशामुक्ती अभियानांतर्गत अमली पदार्थ विरोधी उपक्रम व प्रबोधन यांची एकत्रित माहिती देण्यासाठी जटायु हे पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद व त्याअंतर्गत विविध विभाग संस्था यांच्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) उपलब्ध होण्यासाठी वरदान हे पोर्टल विकसीत करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

दिव्यांग विद्यार्थी जीवन सुरक्षा ठेव योजना (दिविजा)
यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने कार्यान्वित दिव्यांग विद्यार्थी जीवन सुरक्षा ठेव योजना (दिविजा) प्रमाणपत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 हजार रूपयांचे अर्थसहाय्य मिळणार असून विहित मुदतीनंतर दामदुप्पट परतावा मिळणार आहे. 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत केवळ 10 दिवसात या योजनेची संकल्पना अंमलात आणून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

माझ्या गावचा धडा उपक्रम पथदर्शी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला माझ्या गावचा धडा हा उपक्रम कौतुकास्पद असून हा एक पथदर्शी शैक्षणिक उपक्रम असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. या उपक्रमाद्वारे सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गाव, तालुका व जिल्ह्याचे वैशिष्ट्य सांगणारे धडे लिहिले आहेत. यामुळे मुलांना आपल्या गावची, परिसराची, जिल्ह्याची माहिती मिळणार आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका स्वाती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

विविध उपक्रमांची पाहणी व लोकार्पण
बैठकीपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद प्रांगणातील उमेद स्वयंसहायता बचत गट स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या पदार्थांची पाहणी करून त्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

हिरकणी कक्षाचे लोकार्पण, बाल संसाधन व विकास केंद्रास भेट

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्ष व जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चिमुकल्यांसाठी पाळणाघराचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच, जिल्हा परिषद बाल संसाधन व विकास केंद्र येथे मध्यवर्ती ठिकाणी निर्माण झालेल्या कक्षातून जिल्ह्यातील अंगणवाड्यांशी थेट संपर्काची सुविधा निर्माण झाली आहे. याचेही उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले.
बाल संसाधन व विकास केंद्राच्या सुविधेचा अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन, सूचना करण्यासाठी उपयोग होणार आहे. या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनाही काही सूचना करावयाच्या असल्यास तर त्या करू शकतात. अंगणवाडी सेविका या एकूणच लहान मुलांवर संस्कार, शिक्षणाची ओळख करून देण्याबरोबरच जे जे काही चांगले आहे ते मुलांपर्यंत व त्यांच्या पालकापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम आहे. मुलांचा, पालकांचा प्रतिसादही या माध्यमातून अंगणवाडी सेविका देवू शकतील. या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. यावेळी या कक्षाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संदीप यादव यांची सविस्तर माहिती दिली.

नशामुक्त सांगली स्टिकरचे अनावरण

यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत तयार करण्यात आलेले नशामुक्त सांगली स्टिकर्स वाहनांना चिटकवून त्या स्टिकर्सचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनावरती नशामुक्त सांगली हे स्टिकर्स लावून व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आदि उपस्थित होते.

तीन शववाहिनींचे लोकार्पण

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने प्राप्त तीन शववाहिनीचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरील दिशादर्शक फलकाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण, कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!