चिमुकले हरवले शस्त्र पाहण्यात, धाराशिव ग्रामीण पोलिसांचा उपक्रम

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) :-
येडशी येथील जनता विद्यालय आणि धाराशिव ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांच्या वेपन्स डे निमित्त विद्यालयात पोलिसांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत नलावडे होते तर पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे पोलीस उपनिरीक्षक श्री वाघमारे साहेब येडशी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस दलाच्या वेपन्स डे निमित्त धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि जनता विद्यालय येडशी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वपूर्ण कायदे त्याचबरोबर शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक मोरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. तसेच कोणताही अन्याय न लपविता पोलीस हेल्पलाइनला किंवा शाळेच्या तक्रार पेटीत आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले. विद्यार्थी सुरक्षा कायदे, तसेच नागरिकांसाठी विविध कायदे,सायबर क्राईम ,पॉस्को सारख्या अनेक कायद्याबद्दल यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
येडशी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री शिंदे साहेब यांनी विद्यार्थ्यांना विविध रायफली, पिस्टल अश्रुधुर सोडणाऱ्या बंदुका,स्टेनगन यांचा वापर केव्हा केला जातो व ते कसे कार्य करतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रत्येक विद्यार्थ्यांना शस्त्र हाताळण्याची संधी मिळाल्यामुळे अनेक चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता. पोलीस आपले मित्रच आहेत त्यामुळे पोलिस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये सौंदर्यपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण होता. याप्रसंगी धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल घुगे साहेब, चिलवंत साहेब, माचेवाड साहेब, महिला कॉन्स्टेबल सोन्ने मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल आरसेवाड, लोंढे साहेब काळे मॅडम, भोसले मॅडम तसेच येडशी चे पोलीस पाटील कदम साहेब यांची उपस्थिती होती. विद्यालयाचे उपप्राचार्य कांबळे सर व पर्यवेक्षिका नाईकनवरे मॅडम यांचीही उपस्थिती होती. पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन श्री प्रमोद जाधव यांनी केले.



