नाफेडतर्फे सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात दोन खरेदी केंद्र सुरु

सांगली, : जिल्ह्यात पणन हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत दरानुसार नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीकरिता शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलवर दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरु असून, खरेदी १२ जानेवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. जिल्ह्यात विष्णुआण्णा खरेदी विक्री संघ सांगली (संपर्क – 7507777849 श्री. सूर्यकांत शिंदे) व ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सह. खरेदी विक्री संघ, तासगाव (संपर्क – 9420360570 श्री. सुरेश सगरे) या दोन खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरु झाली असल्याचे जिल्हा पणन अधिकारी संदीप जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्ह्यातील विष्णु आण्णा खरेदी विक्री संघ सांगली या खरेदी केंद्रास कवठेमहांकाळ, जत, शिराळा व वाळवा हे तालुके तसेच ॲड. आर आर पाटील शेतकरी सह. खरेदी विक्री संघ, तासगाव खरेदी केंद्रास पलूस, कडेगाव, आटपाडी व खानापूर हे तालुके सोयाबीन खरेदीकरिता जोडण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी चालू हंगामातील सोयाबीन पिकाची पीक पेरा ऑनलाईन नोंद असलेला अद्ययावत मूळ सातबारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, (IFSC CODE ) सहीत, आधारकार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीकरीता आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आर्द्रतेचे प्रमाण 12 टक्के पेक्षा कमी असल्याची व FAQ दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी. त्यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी व ती 12 टक्के पेक्षा कमी असल्यासच सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावे. जेणेकरुन जास्त आर्द्रतेमुळे आपले सोयाबीन परत नेण्याची वेळ येणार नाही, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.



