सांगली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून योजनांच्या प्रचार प्रसारासाठी मेळावा उत्साहात

सांगली –: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळपर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता योजनांचा प्रचार, प्रसार व जास्तीत जास्त लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवासाठी दि. 30 जानेवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली येथे मेळावा संपन्न झाला.
हा मेळावा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म), मुंबई चे महाव्यस्थापक अनिल रा. म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक पुणे श्री मांजरे, जिल्हा व्यवस्थापक एल.ए. क्षीरसागर, सुकुमार कांबळे, श्री. पवार, सुनिल बनसोडे, संदीप ठोंबरे, मनोज यादव, संदीप पाटोळे, गणेश माने, आशोक वायदंडे, प्रशांत आवळे, श्री. देवकुळे, श्री. आशोक, समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी लाभार्थीना योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय निवड, नवीन व नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडीबाबत मार्गदर्शन केले. महामंडळाच्या योजना व प्रस्तावित योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. शासनाने महामंडळास ता. तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे उपलब्ध करुन दिलेल्या जमिन जागेवर सुरु करण्यात येणाऱ्या युपीएससी/ एमपीएससी सेंटर व बहुउपयोगी प्रशिक्षण केंद्राबाबत मार्गदर्शन केले. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन करून अर्जदार, कार्यकर्ते यांनी उपस्थित केलेल्या अडीअडचणी व शंकाचे निरसन त्यांनी यावेळी केले.
महाव्यस्थापक अनिल यांनी महामंडळाच्या सुरु असलेल्या योजना, प्रस्तावित योजना, नव्याने सुरु करावयाच्या योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. महामंडळमार्फत पूर्वी राबविण्यात येत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करुन देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच 5 लाख एनएसएफडीसी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचे अर्ज हे ऑनलाईन स्वीकारणी करणे प्रकिया सुरू करण्यात येत आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रातील तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, जिल्हा अमरावती व नागपूर येथे शासनाने दिलेल्या भुखंडावर बहुउद्देशिय प्रशिक्षण केंद सुरु करण्याकरिता जागा शासनाने उपलब्ध करून दिली असून या जागेवर प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते सुकुमार कांबळे, श्री. पवार, सुनिल बनसोडे, संदीप ठोंबरे, मनोज यादव, संदीप पाटोळे, गणेश माने, आशोक वायदंडे, प्रशांत आवळे, श्री. देवकुळे, श्री, आशोक यांनी मनोगत व्यक्त करताना महामंडळातील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही सुचना करून प्रामुख्याने जामिनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती केली.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक एल.ए. क्षीरसागर यांनी केले व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे व सहशिक्षक चिकुंद्रा यांनी केले. आभार लेखापाल सुधिरकुमार पाटील यांनी मानले.