सांगली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली बँक कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन

दर्पण न्यूज सांगली :- युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन सांगली जिल्हा युनिटच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 रोजी सांगली शहरांमध्ये बँक ऑफ इंडियाच्या पटेल चौक शाखेच्या समोर विविध मागण्यांकरिता निदर्शने करण्यात आली. बँकिंग क्षेत्र आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या व निराकरण न झालेल्या मागण्या आणि धोरणांच्या निषेधार्थ युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच बँकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये विविध कारणास्तव कमालीची घट होत आहे त्यामुळे कामाचा भार वाढत चालला असून कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्यास हानी पोहोचत आहे; त्यामुळे सरकारने व व्यवस्थापनाने त्वरित बँकांमधील सर्व रिक्त पदांची नोकर भरती सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
बँकिंग क्षेत्र हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे परंतु अलीकडच्या काळात बँक कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले, ग्राहकांकडून होणारी गैरवर्तणूक, खोट्या तक्रारी, राजकीय हस्तक्षेप आणि बँकेतील कर्मचाऱ्यांना ठरवून लक्ष करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना संरक्षण अधिनियम लागू करण्याची तातडीची मागणी करण्यात आली आहे.
अनेक देशांमध्ये आठवड्यात फक्त पाच दिवस बँकिंग सेवा दिली जाते. तसेच भारतामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये विविध डिजिटल पर्याय उपलब्ध आहेत. सध्या भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसाचा आठवडा हा नियम लागू केला असून त्याच अनुषंगाने बँकांमध्ये ही पाच दिवसांचा आठवडा हे धोरण लागू करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून, बँक संघटनांनी या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने दिली आहेत. तथापि, ठोस कारवाईच्या अभावामुळे, बँक कर्मचारी आणि ग्राहकांचे हित जपण्यासाठी UFBU ला हे निर्णायक पाऊल उचलावे लागले आहे.
ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे आणि त्यांना त्यांचे बँकिंग व्यवहार त्यानुसार नियोजन करण्याची विनंती करतो. बँकिंग क्षेत्रात पुढील व्यत्यय टाळण्यासाठी या खऱ्या चिंता दूर करण्यासाठी आम्ही सरकारला त्वरित पावले उचलण्याची विनंती करतो.
*या निदर्शनाच्या माध्यमातून बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर पुढील काळात सदरचे हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल तसेच येणाऱ्या 24 व 25 मार्च 2025 रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संपाचा इशारा या निमित्ताने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांच्या माध्यमातून देण्यात आला.*