आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना उपस्थिती ; जि.प.शाळा बामणोली, मनपा शाळा क्र. 7 शाळेत उत्साह

 

दर्पण न्यूज  सांगली : शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी बाणवाव्यात. शिस्त, वेळेचे महत्त्व, पुस्तकवाचन, मैदानी खेळ, फटाक्यांना फाटा देऊन प्रदूषणास आळा व पर्यावरण संवर्धन, तंबाखू व अमली पदार्थ व्यसनापासून दूर राहणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे. उत्तम शैक्षणिक सुविधा व चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षारंभ विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद शाळा, बामणोली व सांगली मिरज कुपवाड महापालिका शाळा क्रमांक 7 सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, मोफत गणवेश व पुस्तके वितरीत करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळा बामणोली येथील कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड तर महापालिका शाळा क्रमांक 7 येथील कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगीळ, मनपा आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, मुख्याध्यापिका स्मिता सौंदते यांच्यासह महानगरपालिका माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पटावर नोंदले गेलेले प्रत्येक बालक दररोज शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शाळा बालकांचे भावविश्व घडविते. सामाजिक विकासात व राष्ट्र जडणघडणीत शाळेची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी असावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षारंभाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांची नियमित हजेरी व वेळेवर उपस्थिती यावर लक्ष देऊन त्यांच्या अंगी शिस्त बाणवावी. शाळेच्या 200 मीटर परिसरात अंमली पदार्थ, तंबाखू विक्री केलेली आढळल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकास बडतर्फ केले जाईल. शैक्षणिक वर्षारंभीच शाळेच्या स्वतःचा पॅटर्न तयार करा. यामध्ये दीपप्रज्वलनावेळी मेणबत्तीचा वापर टाळणे, फटाक्यांना फाटा देणे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणे, शाल, श्रीफळाचा खर्च विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा देण्यासाठी वळवणे अशा बाबी आवर्जून कराव्यात, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान पालकांच्या कथाकथन स्पर्धा घ्याव्यात. त्यांना रक्कम रूपये पाच हजारांचे बक्षीस देऊ, असे घोषित केले. तसेच, विद्यार्थ्यांना पुस्तके, खेळणी पुरवण्याबाबतही सूचित केले. शाळेचे पटांगणाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत शाळा परिसर स्वच्छ करून शाळांचे सुशोभिकरण करण्यात आले होते. पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रमुख वरिष्ठ अधिकारी, स्थानिक शासकीय अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आदिंच्या सहभागाने पारंपरिक वेशभूषेत आलेल्या प्रातिनिधिक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना सवाद्य मिरवणुकीने शाळेत आणण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरीत करण्यात आली. माध्यान्ह भोजन जेवणात गोड पदार्थ देण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल व त्यांच्यामध्ये शाळेबद्दल ओढ निर्माण होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साह, चैतन्य व आनंदमयी होईल, अशा पध्दतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

उन्हाळ्याची सुट्टी संपून शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षारंभ अंतर्गत दि. 16 ते 30 जून या कालावधीत राज्यात व जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे साजरा होत आहे. वय वर्षे 4 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना (दिव्यांग मुलांसह) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत असून, याअंतर्गत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शासन निर्णयानुसार नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात “100 शाळांना भेटी देणे” हा उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!