महाराष्ट्र

विनाअडथळा लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करा : पालकमंत्री, प्रकाश आबिटकर*

जिल्ह्यातील ३८ हजार घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्र तर २४ हजार ६०० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण

 

 

दर्पण न्यूज कोल्हापूर  : – प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये २०१८ च्या सर्वेक्षणानुसार ७० हजार घरकुले मंजुर आहेत. पैकी २०२२-२३ मध्ये ४ हजार तर २०२४-२५ मध्ये ४१ हजार ६०० घरकुले मंजुर झाली आहेत. यातील ३८ हजार घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्र तर २४ हजार सहाशे लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण राज्यस्तरावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हस्ते करण्यात आले. या मंजुर घरकुलांची अंमलबजावणी करीत असताना आम्ही सोबती घरकुलाचे हा उद्देश समोर ठेवून घरकुल लाभार्थ्यांना विनाअडथळा दिलेल्या वेळेत आपल्या घराचे स्वप्न पुर्ण करता येईल, यासाठी सर्व जिल्हा परिषद प्रशासनाने कार्य करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. कोल्हापूर जिल्हा परिषद व करवीर पंचायत समिती यांच्या संयुक्तविद्यमाने स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून दृक श्राव्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन व पुणे येथील मुख्य कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित सर्व घरकुल लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. कोल्हापूर येथे यावेळी कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस., प्रकल्प संचालक सुषमा देसाई, गट विकास अधिकारी दीपाली पाटील, माजी सभापती राजु सुर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.आबिटकर म्हणाले, ‘महा आवास अभियान’ २०२४-२५ अंतगर्तत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सर्वात महत्वाची घरकुल योजना आहे. कोल्हापूर जिल्ह‌यात या योजनेत आज अखेर सन २०१६-१७ ते २०२०-२१ अखेर १६५०५ घरकुले मंजूर झाली आहेत. सन २०२४-२५ या वर्षात ४१६५१ घरे मंजूर करण्यात आली आहेत. ग्रामीण घरकुलांचा तांत्रिक दर्जा उत्तम राहावा म्हणून ग्रामीण गृह अभियंते नेमण्यात आले आहे. त्यांच्या सेवा जिल्हा परिषदने सर्व लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ९० दिवसांची मंजूरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला शौचालय बांधकाम साठी बारा हजार रूपये मिळतील याची जिल्हा परिषदेने खात्री करावी. घरकुलांचे सर्व हप्ते वेळेत मिळतील याची विशेष दक्षता घ्यावी. सर्व मंजूर घरकुले ‘मिशन मोड’ वर काम करून ३१ मे २०२५ अखेर पूर्ण करून घ्यावीत. रमाई आवास, मोदी आवास, अटल कामगार आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. लाभार्थ्याना वाळू -खडी – वीट – इतर साहित्य गावातच उपलब्ध होईल याबाबत जिल्हा परीषदने विशेष नियोजन करावे. आत्तापर्यंत घरकुल मंजुरी प्रक्रियेत केलेल्या कामकाजाबद्दल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक तसेच सर्व गट विकास अधिकारी तसेच ग्रामसेवकांचे अभिनंदनही केले. येत्या मे अखेर याबाबत एका मोठ्या कार्यक्रमातून पुर्ण झालेल्या घरांचा लोकर्पण सोहळा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वसामान्य लोकांना घरकुल योजनेमधून घरांना मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान व गृहमंत्री यांचे आभार मानले. ते म्हणाले, राज्यस्तरावरून आज २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरीत करण्यात आला. हा एक गृहोत्सवच आहे. केंद्र शासनाने डीबीटीमधून पारदर्शकपणे प्रत्येक लाभार्थ्याला एका क्लीकवर अनुदान देण्याची महत्त्वकांक्षी प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही सोबती घरकुलांचे या नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषद प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला वीज, शुद्ध पाणी, शौचालय सुविधा, सुर्य घर योजना तसेच उज्ज्वला योजनेतून गॅस देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता येत्या अधिवेशनात आम्ही १ लाख २० हजार घरकुल अनुदानात वाढ करीत अडीच लाख रूपये वाढविण्यासाठी मागणी करणार आहे. सर्व शेतकरी वर्ग उन्नत होण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजनांमधून प्रयत्न सुरू केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार अमल महाडिक यांनी यावेळी आपल्या मनोगतामधून भूमिहीन नागरिकांनाही या योजनेतून घरकुल विनाअडथळा मिळावीत याबाबत मागणी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी यावेळी प्रास्ताविकामध्ये जिल्ह्यातील घरकुल योजनांबाबत माहिती देवून सद्यस्थिती सांगितली. तसेच येत्या काळात पालकमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या सुचनांनुसार चांगल्या पद्धतीने कामे वेळेत पुर्ण करण्याची ग्वाहीही दिली. कार्यक्रमात घरकुल बांधकामातील गुणवत्ता व प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण व माहिती प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी दिली. पुणे येथील मुख्य कार्यक्रमाचे प्रक्षेपण या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित लाभार्थ्यांनी पाहिले. कोल्हापूर येथे कार्यक्रमावेळी प्रातिनिधीक स्वरूपात खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते ११ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले. यात मुडशिंगी ग्रामपंचायतीअंतर्गत साताबाई सोनुर्ले, धोंडुबाई सोनुर्ले, दत्तात्रय सोनुर्ले, सदाशिव सोनुर्ले, बाबुराव सोनुर्ले, रामदास सोनुर्ले, सर्जेराव सोनुर्ले, प्रकाश सोनुर्ले व रविंद्र सोनुर्ले, म्हाळुंगे ग्रामपंचायतीमधील रविंद्र चौगुले,कावणे येथील महिपती पाटील तर कावने ग्रामपंचायतीमधील विजय कारंडे यांचा समावेश होता. झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रहार पाटील यांनी केले तर आभार गट विकास अधिकारी दिपाली पाटील यांनी मानले.

*आम्ही सोबती घरकुलाचे – नाविण्यपुर्ण उपक्रम*

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांसाठी आम्ही सोबती घरकुलाचे मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत सर्व योजनांचा कृतीसंगम एकाच व्यासपीठावरती उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. घरकुलांचे काम स्पर्धात्मक होण्यासाठी एक विशेष प्रतियोगिता घेण्यात येणार आहे. १०० दिवसांमध्ये घराचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यासाठी महिला बालकल्याण विभागामार्फत घरातील महिलेला पिठाची गिरणी मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये प्रामुख्याने महसूल विभागामार्फत देण्यात येणारे रेशन कार्ड, आधार कार्ड इत्यादी, ग्रामविकास व पंचायतराज मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत नळजोड, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री सुर्य घर योजना तसेच ग्रामपंचायत मार्फत सर्व शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक ३० दिवसांकरिता एक लकी ड्रॉ स्पर्धेतून प्रत्येक तालुक्यातील एक प्रमाणे लाभार्थ्यांसाठी विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. याचबरोबर घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ देण्यासाठी बँक गृह कर्ज मेळावेही घेण्यात येणार आहेत. लँड बँक, सँड बँक, घरकुल मार्ट इत्यादी मधून घरकुल बांधकामासाठी आवश्यक साहित्य सहज मिळावे यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!