महाराष्ट्र

एकही नागरिक बेघर राहणार नाही यासाठी शासन कटिबध्द :  ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

 

 

  दर्पण न्यूज   सांगली  : महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजूरी पत्र व किमान 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. जे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत त्यांचे सर्वेक्षण करून त्यांनाही लाभ देवू. एकही नागरिक बेघर राहणार नाही यासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

       राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासमवेत दूरदृष्यप्रणालीव्दारे प्रधानमंत्री आवास टप्पा-2 शुभारंभाच्या नियोजनाबाबत जिल्हा परिषद सांगली येथील बैठक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृष्यप्रणालीव्दारे ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तर प्रत्यक्ष सांगली येथे बैठकीच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे आदि उपस्थित होते.

          ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, हा राज्यस्तरीय कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणार आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर देखील लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2  मधील राज्यातील 10 लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायतस्तरावर दिसण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्क्रीन, एलसीडी प्रोजेक्टर व इंटरनेटची व्यवस्था करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन होईल याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

          आत्तापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 मधील 18 लाख 19 हजार 830 लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली असून उर्वरित 1 लाख 46 हजार 937 लाभार्थ्यांना मंजूरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, या कार्यक्रमास ग्रामपंचायत, तालुकास्तर व जिल्हास्तरावर मान्यवर लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, लाभार्थी यांना निमंत्रित करून हा कार्यक्रम एक उत्सव स्वरूपात साजरा होईल यासाठी सर्वांनी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देशही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिले.

          प्रारंभी या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सविस्तर माहिती देवून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सक्रीय योगदान देण्याचे आवाहन केले.

          सांगली जिल्ह्यात या योजनेंतर्गत मंजूरी व पहिला हप्ता वितरणाचे 32 हजार 133 इतके उद्दिष्ट असून आत्तापर्यंत 93.9 टक्के लाभार्थ्यांचे एफटीओ जनरेट करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांचे एफटीओ जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!