महाराष्ट्र

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 

दर्पण न्यूज    सांगली : अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा. अमली पदार्थ लागवड, वाहतूक, विक्री व तस्करी करणाऱ्यांची कसलीही गय करू नये, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्समध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक, एम. आय. डी. सी. च्या प्रादेशिक अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, औषध विभाग हे सदस्य आहेत. या टास्क फोर्सच्या कामगिरीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील दर आठवड्याला आढावा घेणार आहेत. यावेळी मागील आठवड्यात केलेली कामगिरी, पुढील आठवड्यातील नियोजन करण्यात येईल. प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी व आव्हाने याचा आढावा घेतला जाणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थांच्या दुष्परिणामसंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी. त्यासाठी अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीत तयार करावी. शाळा महाविद्यालयातील मुले, युवकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजून सांगावेत, जेणेकरून भावी पिढी यापासून दूर राहू शकेल. आगामी कालावधीत आपण वैयक्तिकरीत्या शाळा महाविद्यालयांना भेट देऊ, असे ते म्हणाले.

अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्सने स्वतःचा आराखडा तयार ठेवावा. नागरिकांना विश्वास द्यावा, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील 134 बंद कारखाने तपासणी मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत. टास्क फोर्सने ही तपासणी मोहीम जलद गतीने पूर्ण करावी. ज्यांचा अशा अमली पदार्थ कारवायांमध्ये सहभाग नाही, त्यांना कदाचित त्रास होईल. मात्र, अशा कारखानदारांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलिस दलाने गस्त वाढवावी. गोपनीय खबर मिळण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. अमली पदार्थ विरोधी कारवाई केल्यानंतर अशा खटल्यात कोणतीही त्रृटी ठेवू नका. अमली पदार्थ तस्करांना कडक शिक्षा होण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करा. त्याचबरोबर माहिती देणाऱ्यांना सुरक्षा द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन व जनजागृती करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेण्याबाबत पुनरूच्चार करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी सर्वच माध्यमात अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून याबाबत जनजागृती करावी. त्यासाठी मानधन दिले जाईल़, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, पोलीस स्थानक निहाय तपासणी पथक करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील बंद कारखाने तपासावेत. तसेच, बंद कारखान्यांची तपासणी करणेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने 2025 मध्ये अमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईची तसेच, गत वर्षी केलेल्या कारवाईची माहिती सादर केली. तसेच शाळा महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व प्राध्यापक यांची बैठक घेऊन अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्याबाबत मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!