स्वाधार योजनेच्या लाभासाठी विहित वेळेत त्रृटीपूर्तता करा : सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

दर्पण न्यूज सांगली : स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जामध्ये बहुतांशी त्रृटी असल्याचे ऑनलाईन छाननी करताना निदर्शनास आले आहे. त्रृटींची, कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता अर्ज पुनश्च: विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये पाठविण्यात येत आहेत. सन 2024-25 या आर्थिक वर्षांचा अल्प कालावधी शिल्लक राहिल्याने स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org किंवा MahaIT या पोर्टलवर लॉगीन करुन त्रृटींची, कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज फेर समाज कल्याण कार्यालयास पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात यावे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करता येईल, असे समाज कल्याण सांगली चे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन त्रृटींची पूर्तता न केल्यास तसेच विद्यार्थी त्रृटीपुर्तते/ कागदपत्रांअभावी लाभापासून वंचित राहिल्यास त्यास समाज कल्याण सांगली कार्यालय जबाबदार राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्रकात स्पष्ट केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11वी, 12वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता 25 हजार रूपये, निवास भत्ता 12 हजार रूपये, निर्वाह भत्ता 6 हजार रूपये असे एकूण प्रति विद्यार्थी रक्कम 43 हजार रूपये इतकी रक्कम तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5 हजार रूपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रूपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.


